krantisinh Nana Patil Death Anniversary: झुंझार नेते क्रांतिसिंह नाना पाटील यांचा स्मृतिदिन; संसदेत मराठीत भाषण करणारे पहिले खासदार, जाणून घ्या या थोर स्वातंत्र्यसेनानीच्या कार्याबद्दल
krantisinh Nana Patil (संग्रहित संपादित प्रतिमा)

भारतीय स्वातंत्र्यलढयामधील एक झुंझार नेते म्हणून क्रांतिसिंह नाना पाटील (Krantisinh Nana Patil) यांच्याकडे पाहिले जाते. प्रामुख्याने सातारा, सांगली भागात त्यांनी स्वातंत्र्याची एक मोठी चळवळ उभी केली. पत्री सरकार किंवा प्रतिसरकार हा समांतर शासनाचा एकमेवाद्वितीय प्रयोग राबवला. ग्रामराज्याची स्थापनाही त्यांनीच केली. अशा या थोर सेनानीचा आज स्मृतिदिन (krantisinh Nana Patil Death Anniversary). नानांचा जन्म 3 ऑगस्ट 1900 रोजी येडेमच्छिंद्र येथे झाला. 6 डिसेंबर, 1976 रोजी त्यांचा मृत्यू झाला. ग्रामीण भागातील बहुजनसमाजातील लोकांचा स्वाभिमान जागृत करून त्यांना स्वातंत्र्य चळवळीत सहभागी करून घेणे हे नानांचे प्रमुख योगदान होय.

संसदेत मराठीत भाषण करणारे ते पहिले खासदार होते. इंग्रज राजवटीत दीड हजार गावांमध्ये प्रतिसरकार चालवणारे ते थोर स्वातंत्र्यसेनानी होते. क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या स्मृतिदिनानिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांना अभिवादन केले आहे. क्रांतिसिंहांनी देशाच्या स्वातंत्र्यालढ्यात दिलेले योगदान तसेच देशाच्या जडणघडणीसाठी, बहुजन समाजाच्या विकासासाठी त्यांनी केलेले कार्य सदैव प्रेरणा देत राहील, अशा शब्दात उपमुख्यमंत्र्यांनी त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.

क्रांतिसिंह नाना पाटील खऱ्या अर्थानं ‘क्रांतिसिंह’होते. महात्मा गांधीजींनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी सुरु केलेल्या असहकार चळवळीपासून इंग्रज सत्तेला आव्हान देणाऱ्या ‘प्रतिसरकार’आंदोलनापर्यंतचा त्यांचा लढा भारतीय स्वातंत्र्यचळवळीत सुवर्णाक्षरांनी लिहिला गेलेला इतिहास आहे. सातारा, सांगली, कोल्हापूर भागातल्या दीड हजार गावात ‘प्रतिसरकार’च्या माध्यमातून त्यांनी लोकन्यायालये, बाजारव्यवस्था, अन्नधान्य पुरवठ्यासाठी पर्यायी यंत्रणा निर्माण केली होती. गावगुंड, समाजकंटकांवर वचक निर्माण केला होता.

स्वातंत्र्य लढ्याबरोबरंच त्यांनी देशाच्या जडणघडणीत योगदान दिले. शिक्षणप्रसार, व्यसनमुक्ती, अंधश्रद्धा निर्मुलन, अनिष्ठ रुढी-परंपरांवर बंदी यासाठी प्रबोधनाचे कार्य केले. 1930 च्या सविनय कायदेभंग चळवळीचे कार्य करण्यासाठी नाना पाटलांनी नोकरीचा त्याग केला. 1920 ते 1942 या काळात नाना 8-10 वेळा तुरुंगात गेले. 1942 ते 46 या काळात ते भूमिगतच होते. (हेही वाचा: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन; मराठी Wallpapers, WhatsApp Status, HD Images शेअर करून करा महामानवाला वंदन)

26 मे 1966 साली मुंबईच्या शिवाजी पार्कमध्ये भरलेल्या सभेत आचार्य अत्रे यांनी क्रांतिकारक नाना पाटील यांना ‘क्रांतीसिंह’ ही पदवी बहाल केली. भारत स्वतंत्र झाल्यानंतर नाना पाटलांनी 1957 सालच्या लोकसभा निवडणुकीत उत्तर सातारा मतदारसंघातून लोकसभेची निवडणूक जिंकली. 1967 साली बीड लोकसभा मतदारसंघातून भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे उमेदरवार म्हणून ते निवडून आले. क्रांतिसिंह नाना पाटील यांचे 6 डिसेंबर 1976 रोजी सांगली जिल्ह्यातील वाळवा येथे निधन झाले.