Ganeshotsav 2019: असं असेल तर मग गणपती आरती म्हणूच नका! थेट रेकॉर्डच लावा ना
Tambdi Jogeshwari Ganpati | Image used for representational purpose only | (Photo Credits: Facebook)

Ganeshotsav 2019: सकळ विद्येची देवता असलेल्या गणरायाच्या स्वागतासाठी अवघे गणेशभक्त सज्ज झाले आहेत. हे गणेशभक्त संपूर्ण गणेशोत्सव काळात गणरायाची पूजा मोठ्या भक्तीभावाने करतात खरं. पण, त्यांना कळतच नाही की, त्यांची भक्ती ही गणपतीपर्यंत पोहोचतच नाही. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे गणपती आरती (Ganpati Aarti) . होय, आपल्यापैकी बहुतेकांना गणपती (Ganpati) आरती योग्य पद्धतीने म्हणता येत नाही. बहुतेकांची आरती तोंडपाट असते. पण, शब्दांच्या उच्चारणावेळी ही मंडळी भलातच घोल घालतात. इतका की, अनेकदा आरतीत नसलेलेच शब्द आरतीत घुसडले जातात. जसे की, ‘लंबोदर पितांबर , ‘फळीवर वंदना’, ‘ओटी शेंदुराची’, ‘संकष्टी पावावे’वैगेरे. काळजीपूर्वक ध्यान द्या आणि पाहा तुम्हीही कदाचित असे उच्चार करत असाल. हे उच्चा ऐकूण कदाचित गणपती बाप्पाही म्हणत असतील असेच जर उच्चार करायचे होते तर मग, आरती म्हणूच नका. थेट रेकॉर्डच लावा. अर्थात, देव भक्तीचा भुकेला. भक्ताची भावना महत्त्वाची. हे खरेच. पण, जर शब्दांचे उच्चार माहिती झाले तर, तसे उच्चारायला काय हरकत आहे?

पाहा गणपतीची आरती म्हणताना लोक काय चुका करतात….

चूक – लंबोदर पितांबर ‘फळीवर वंदना’

बरोबर – लंबोदर पितांबर फणिवर वंदना

चूक – ‘ओटी शेंदुराची’

बरोबर – उटी शेंदुराची

चूक – ‘संकष्टी पावावे’

बरोबर – संकटी पावावे

चूक – वक्रतुंड ‘त्रिमेना’

बरोबर – वक्रतुंड त्रिनयना

चूक – दास रामाचा वाट पाहे ‘सजणा

बरोबर – दास रामाचा वाट पाहे सदना

चूक – ‘लवलवती’ विक्राळा

बरोबर – लवथवती विक्राळा

(हेही वाचा, Ganesh Chaturthi 2019 Muhurat : गणेशाची पूजा कशी केली जाते, याची माहिती आहे का? मग जाणून घ्या गणेशोत्सवातील पूजा, महूर्त आणि महत्व)

श्री गणपतीची पूर्ण आरती

सुखकर्ता दु:खहर्ता वार्ता वीघ्नाची।

नुरवी पुरवी प्रेम कृपा जयाची॥

सर्वांगी सुंदर उटी शेंदुराची।

कंठी झळके माळ मुक्ता फळांची॥1॥

जयदेव जयदेव जय मंगलमूर्ती।

दर्शनमात्रें मन: कामना पुरती॥ ध्रु.॥

रत्नखचित फरा तुज गौरीकुमरा।

चंदनाची उटी कुंकुमकेशरा॥

हिरेजडित मुगुट शोभतो बरा।

रूणझुणती नुपुरे चरणी घागरीया॥ जय.॥2॥

लंबोदर पीतांबर फणिवरवंधना।

सरळ सोंड वक्रतुंड त्रिनयना॥

दास रामाचा वाट पाहे सदना॥

संकटी पावावें निर्वाणीं रक्षावें सुरवरवंदना ॥ जय.॥3॥ 

लता मंगेशकर यांच्या आवाजात गणपती आरती

तुम्ही जर खरोखरच गणपतीचे भक्त असाल. त्याची मनोभावे सेवा करत असाल तर, तुमच्यासाठी वरची माहिती महत्त्वाची आहे. गणपतीची आरती चुकीच्या पद्धतीने म्हटल्यामुळे केवळ शब्दांचे अर्थच बदलत नाहीत. तर, आरतीतील संबंध ओळीचाच अर्थ बदलतो. आपण आरतीवेळी होणाऱ्या चुका जाणून घेतल्या पाहिजेत. तसेच , वापरल्या जाणाऱ्या चुकीच्या शब्दांऐवजी कोणता योग्य शब्द वापरला पाहिजे हे देखील समजून घेतले पाहिजे.