आज नऊ दिवसांच्या नवरात्र उत्सवाची सांगता दसरा सणाने होणार आहे. साडेतीन मुहुर्तांपैकी एक असलेल्या या दिवशी अनेक शुभकार्य केली जातात. नवीन वस्तू, घर, गाडी खरेदीसाठी हा दिवस शुभ मानला जातो. तसंच विजयादशमी निमित्त सोनं खरेदीसाठी लोकं मोठ्या प्रमाणावर गर्दी करतात. आश्विन शुद्ध दशमी तिथी आणि दुष्ट प्रवृत्तींवर विजय मिळवल्याचा हा दिवस म्हणून 'विजयादशमी' या नावाने ओळखला जातो. या दिवशी रावण दहनासह सरस्वती पूजन, शस्त्र पूजनही केले जाते. तसंच या दिवशी आपट्यांच्या पानांना विशेष महत्त्व असते. त्यामुळे त्याचीही पूजा केली जाते. त्यानंतर ही पाने सोने म्हणून लुटली जातात. (Dussehra Special Rangoli : दसऱ्याला काढा 'या' सुंदर आकर्षक आणि सोप्या रांगोळी)
साडेतीन मुहुर्तांपैकी एक असल्याने आजचा संपूर्ण दिवस पूजनासाठी शुभ मानला जातो. परंतु, साधारण सकाळच्या वेळीच ही पूजा केली जाते. तर जाणून घेऊया कसे दसऱ्यानिमित्त कसे कराल सरस्वती आणि शस्त्रपूजन?
सरस्वती पूजन:
पाटी, वहीवर सरस्वतीचे प्रतिकात्मक चिन्ह काढा. एका पाटावर किंवा चौरंगावर लाल वस्त्र अंथरुन त्यावर साकारलेले सरस्वतीचे चिन्ह ठेवा. त्यासोबतच अभ्यासाची पुस्तके मांडा. सध्याच्या डिजिटल युगात लॅपटॉप, कॉम्प्युटरच्या माध्यमातून काम होत असल्याने त्याचीही पूजा केली जाते. त्यावर हळद-कुंकू अक्षता वाहा. फुलं वाहा. दिवा-अगरबत्ती ओवाळून नमस्कार करा. सरस्वती कला आणि विद्येची देवता असल्याने दसऱ्यादिवशी वाद्यांच्याही पूजा केली जाते. (How To Make Saraswati On Slate : सरस्वती पूजनाला पाठीवर सोप्या पद्धतीने अशी काढा सरस्वती)
शस्त्रपूजन:
शस्त्रं पूजनाची परंपरा पांडवांपासून सुरु झाली. सरस्वती पूजनासोबत शस्त्रपूजन करण्यासाठी त्याच पाटावर किंवा शेजारी घरातील शस्त्र म्हणजे सुऱ्या, विळी, स्क्रु ड्राव्हर, पक्कड इत्यादी मांडून त्यावरही हळद-कुंकू अक्षता वाहा. फुलं वाहा. दिवा-अगरबत्ती ओवाळा. सोबत एखादा गोड पदार्थ किंवा साखर यांचा नैवैद्यही दाखवला जातो. तसंच शेजारी आपट्याच्या पानांची जुडी ठेवून त्याचीही पूजा केली जाते.
संपूर्ण भारतात दसऱ्याचा सण मोठ्या आनंदात आणि उत्साहात साजरा केला जातो. या निमित्ताने दारी रांगोळी काढली जाते. तोरणमाळा लावल्या जातात. कोविड-19 चे संकट असल्याने तुम्हीही यंदाचा दसरा विशेष खबरदारी घेत आनंदात साजरा करा. दसऱ्याच्या मन:पूर्वक शुभेच्छा!