Diwali Crackers: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दिवाळीत फटाके फोडणे ठरू शकते घातक; कारण घ्या जाणून
Firecrackers | Photo Credits: Pixabay

दिवाळी (Diwali 2020) हा भारतीय हिंदू सण असून देखील जगातील अनेक राष्ट्रांत हा सण मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. भारतीयांसोबतच अभारतीय देखील मोठ्या प्रमाणात सहभाग घेतात. परंतु, दिवाळीत फोडल्या जाणाऱ्या फटाक्यांमुळे (Diwali Crackers) ध्वनी आणि वायु प्रदुषणात भर पडते. यामुळे दरवर्षी फटाक्यांच्या दुष्परिणामांची चर्चा होते. मात्र, यावर्षी संपूर्ण जगभरात कोरोनाचे संकट (Coronavirus) वावरत असल्याने अधिक काळजी घेण्याची गरज आहे. कोरोनापासून बचावासाठी मास्क वापरणे, वारंवार हाताला सॅनिटायझर (Sanitizer) लावणे आणि तसेच सोशल डिस्टसिंगचे पालन करणे गरजेचे आहे. परंतु, दिवाळीत फटाके फोडतांना यापैकी वारंवार सॅनिटायझरने हात साफ करणे ही सवय मात्र महागात पडू शकते.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रत्येकजण सॅनिटाइझरचा वापर करत आहे. यामुळे सॅनिटाइझरचा वापर करताना बऱ्याच गोष्टी लक्षात ठेवणे गरजेचे आहे. सॅनिटायझरमध्ये अल्कोहोलयुक्त पदार्थ असल्यामुळे तो लवकर पेट घेतो. यामुळे सॅनिटाइझर वापरताना केलेली हलगर्जी तुमच्या जीवावर बेतू शकते. तसेच ज्या लोकांच्या घरात लहान मुले आहेत, त्यांनी अधिक काळजी घेतली पाहिजे. कारण, फटाके फोडताना त्यांचा हाताला किंवा शरिराला मोठी इजा होण्याची शक्यता आहे. फटाके फोडतांना आकाशात उंच जाऊन फुटणारे फटाके टाळावेत आणि सॅनिटायझर ऐवजी साबणानं हात धुवावे असे आवाहन केले जात आहे. हे देखील वाचा- Eco Friendly Diwali 2020: शेणापासून बनवलेले दिवे, रांगोळी ते Green Firecrackers असा साजरा करू शकता यंदा कोरोनाच्या सावटाखाली सुरक्षित दीपोत्सव 2020!

नाशिक जिल्ह्यात वडाळा गावात मेणबत्तीच्या प्रकाशात सॅनिटाइझर करताना आगीचा भडका उडल्याने एका महिलेच्या मृत्यू झाला होता. ही दुर्दैवी घटना 20 जुलै रोजी घडली होती. या अपघात संबंधित महिला 90 टक्के भाजली होती. ज्यामुळे उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. या घटनेनंतर नाशिक शहरात एकच खळबळ माजली होती.

दिवाळीत अनेक राज्यांमध्ये फटाकेबंदीची घोषणा झाली आहे. महाराष्ट्रात ठाकरे सरकारने फटाकेबंदी केली नसली तरी फटाकेमुक्त दिवाळी साजरी करा असे आवाहन केले आहे. कोरोना आणि लॉकडाऊनला कंटाळलेल्या अनेकांना यंदाची दिवाळीतरी धुमधडाक्यात साजरी करावी असे अनेकांना वाटत आहे. परंतु, नागरिकांची सुरक्षा अधिक महत्वाची आहे.