Diwali 2018: दिवाळीत नरकचतुर्दशी दिवशी अभ्यंगस्नान का केले जाते?
अभ्यंगस्नान Photo Credit : youtube

दिवाळीत नरकचतुर्दशीच्या दिवशी पहाटे उठून अभ्यंगस्नान करण्याची प्रथा आहे. या दिवशी अंगाला सुगंधित तेलाचा मसाज केला जातो. त्यानंतर उटाण्याने आंघोळ करून करटोली फोडून दिवस सुरू करण्याची प्रथा आहे. दिवाळीच्या दिवशीच अभ्यंगस्नान का केले जाते ? त्यामागील कारण काय प्रश्न तुम्हांला सतावत असेल तर धार्मिक परंपरेसोबतच आरोग्यदायी कारणांसाठी अभ्यंगस्नान आणि दिवाळीचा घनिष्ट संबंध आहे. नक्की वाचा : Diwali 2018 : मिठायांवरील चांदीचा वर्ख भेसळयुक्त तर नाही ना ? या'4' सोप्या टेस्टने घरच्या घरीच ओळखा

दिवाळी आणि अभ्यंगस्नान

पूर्वीच्या काळी दिवाळीच्या पहाटे थंडीचा कडका असे. मात्र आजकाल ऋतूमानात झपाट्याने होत असलेल्या बदलामुळे किंवा ग्लोबल वॉर्मिंगमुळे वातावरणात थंडावा नसतो. मात्र या काळात थंडीला सुरूवात होते. अशावेळेस त्वचा शुष्क होण्यास सुरूवात झालेली असते. त्वचेला मुलायम ठेवण्यासाठी सुगंधित तेलाचा मसाज केला जातो. नारळाच्या दूधात, मलईमध्ये उटणं भिजवून ते शरीराला लावलं अधिक फायदेशीर आहे.

थंडीच्या दिवसात तीळाचं तेल प्रामुख्याने वापरलं जातं. शरीरावर तीळाच्या तेलाचा मसाज करणं आरोग्यदायी आहे. यामुळे त्वचा तजेलदार होते सोबतच शरीरात उष्णता निर्माण होण्यास मदत होते. पित्ताचे प्रमाण कमी होते, रक्ताभिसरणाची प्रक्रिया वाढीस लागते. टाळूपासून संपूर्ण शरीराला मसाज केल्याने स्नायू मजबूत होतात, हाडांना बळकटी येते. Diwali 2018 : दिवाळीच्या उत्साहात हेल्दी राहण्यासाठी खास '6' टिप्स !

नरकचतुर्दशी दिवशी अभ्यंगस्नान कसे कराल ?

दिवाळीचा पहिला दिवस हा नरकचतुर्दशीचा आहे. या दिवशी सकाळी सूर्योदयापूर्वी उठा. त्यानंतर अंगाला तेलाचा मसाज करा. मसाज केल्यानंतर किमान 30 मिनिटांनी आंघोळ करावी.

तेलाचा थर काढण्यासाठी अंगाला उटणं लावणं फायदेशीर आहे. तेलामुळे त्वचेवर ओरखडे पडणार नाहीत.

कोमट पाण्याने आंघोळ करा. उटण्याचा थर गेल्यानंतर साबण लावून तुम्ही आंघोळ करू शकता.

आठवड्यातून किमान एकदा आंघोळीपूर्वी शरीराला तेलाचा मसाज करणं फायदेशीर आहे. तसेच बाजारातून दिवाळीसाठी उटणं विकत घेण्यापेक्षा ते घरच्या घरी बनवणंदेखील सहज सोप्पं आणि सुरक्षित आहे. मग पहा घरच्या घरी कसं बनवाल सुगंधी उटणं ?