Diwali 2018 : उटणं केवळ दिवाळी दिवशी अभ्यंग स्नान करण्यासाठी नव्हे तर नियमित वापरणं 'या' कारणांसाठी फायदेशीर  !
दिवाळीच्या अभ्यंगस्नानासाठी उटणं Photo Credits : PIxabay

दिवाळीची पहिली आंघोळ ही अत्यंत खास असते. या आंघोळीमध्ये अभ्यंगस्नानाचं विशेष महत्त्व आहे. सुगंधित तेलाचा वापर करून शरीरावर मसाज केला जातो. त्यानंतर उटण्याने दिवाळीच्या दिवशी आंघोळ करण्याची प्रथा आहे. आजकाल सार्‍यांचीच जीवनशैली अत्यंत व्यस्त झाली आहे. त्यामुळे बाजरातून रेडीमेड उटणं आणलं जातं. केवळ एका दिवसापुरता उटणं पाहिजं म्हणून अनेकजण फार काही न पाहता उटणं विकत घेतात. मात्र योग्य घटकांचा वापर करून उटणं बनवलेलं नसेल तर ते त्वचेसाठी त्रासदायक ठरू शकतं. दिवाळीत नरकचतुर्दशी दिवशी अभ्यंगस्नान का केले जाते?

बाजारातील विकतच्या उटण्यापेक्षा घरच्या घरी सुरक्षित पद्धतीने आणि झटपट उटणं बनवलं जाऊ शकतं. मग पहा यंदा घरच्या घरी कसं बनवाल उटणं ?

घरच्या घरी उटणं बनवण्यासाठी -

नागरमोथा

मुलतानी माती

गव्हला कचरा

दारू हळद

आंबे हळद

साधी हळद

चंदनपावडर

गुलाबपावडर

वरील सारे मिश्रण एकत्र करा. आंघोळ करण्यापूर्वी हे मिश्रण दूध, गुलाबपाणी, नारळाचं दूध यामध्ये मिसळा. तुम्हांला अ‍ॅलर्जी नसल्यास यामध्ये बेसनही मिसळता येऊ शकते. उटणं हे नैसर्गिकरित्या उत्तम स्क्रबर आहे. शरीरावर उटणं लावण्यापूर्वी तेल अवश्य लावावे. कोरड्या त्वचेवर ओरखडे पडण्याची शक्यता असते.

खास टीप - तुमच्या नजीकच्या आयुर्वेदीक भंडार दुकानातून ताजी स्वरूपात आणि अत्यंत बारीक पावडर स्वरूपातील पदार्थ निवडा. अगदीच रवाळ असल्यास त्वचेला त्रास होतो.

उटण्याचे फायदे -

केवळ दिवाळीच्या अभ्यंगस्नानापुरता उटणं मर्यादीत नाही. दिवाळी व्यतिरिक्तही नियमित चेहरा धुण्यासाठी, शरीरावरील मृत पेशींचा थर काढण्यासाठी उटणं फायदेशीर आहे.

उटण्यामुळे शरीरात रक्ताभिसरणाच्या प्रक्रियेला चालना मिळते.

चेहर्‍यावरील अनावश्यक केस हटवण्यासाठी, उन्हामुळे काळवंडलेली त्वचा पुन्हा तजेलदार करण्यासाठी उटणं फायदेशीर आहे.

अ‍ॅक्ने, पिंपल्स, पिगमेंटेशनचा त्रास कमी करण्यासाठी उटणं अत्यंत गुणकरी आहे.