क्रांतिकारक चंद्रशेखर आजाद (Chandra Shekhar Azad) यांची आज 89 वी पुण्यतिथी. जाज्वल्य देशाभीमान, देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी प्राणाची आहूती देण्याची आणि इंग्राजांच्या छावणीत घुसून इंग्रजांना सळो की पळो करुन सोडणाऱ्या या क्रांतिकारकाचा आज स्मृतीदिन. चंद्रशेखर आजाद यांनी स्वत:सोबतच अनेकांना देशाच्या स्वातंत्र्यसंग्रामात सहभागी होण्यासाठी प्रेरीत केले. चंद्रशेखर आजाद, भगत सिंह आणि सुखदेव या तिघांना भारताचे थोर क्रांतीकारक मानले जाते. चंद्रशेखर आजाद यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्याच्या जीवनातील घडामोडींचा थोडक्यात आढावा.
चद्रशेखर आजाद यांचा जन्म 23 जुलै 1906 मध्ये उत्तर प्रदेश येथील उन्नाव जिल्ह्यातील बदरका गावात झाला. त्यांच्या आई वडीलांचे नाव सीताराम तिवारी आणि जगराणी तिवारी असे होते. सीताराम तिवारी हे अलीराजपुर (आजचे मध्यप्रदेश स्थित) येथे लोकसेवा करत. तर, चंद्रशेखर यांचे बालपण भवरा येथे गेले. आईच्या आग्रहावरुन चंद्रशेखर आजाद यांनी संस्कृतचे शिक्षण घेतले. त्यासाठी ते काशी विद्यापीठात शिकण्यासाठी बनारस गेले.
चंद्रशेखर आजाद हे 1919 मध्ये अमृतसर येथे ब्रिटीशांनी घडवून आणलेल्या जालीयनवाला बाग हत्याकांडामुळे व्यथीत झाले. 1921 मध्ये जेव्हा महात्मा गांधी यांनी असहकार आंदोलन सुरु केले तेव्हा चंद्रशेखर आझातही त्यात सहभागी झाले आणि सक्रिय क्रांतिकारी रुपाने या लढ्यात सहभागी झाले. इंग्रजांनी त्यांना अटक केली. वयाच्या केवळ 15 व्याव वर्षीच त्यांना शिक्षा झाली. न्यायधिशांनी त्यांना जेव्हा नाव विचारले तेव्हा त्यांनी 'आजाद' असे सांगितले. त्यांनी आजाद असे उच्चारताच उपस्थीत तरुणांनी भारत माता की जय च्या घोषणा दिल्या. तेव्हापासून त्यांच्या नावासमोर आजाद असे लागले.
सशस्त्र क्रांतीचा मार्ग स्वीकारताना चंद्रशेखर आजाद हे प्रथम काकोरी ट्रेन लूटण्याच्या कटात (1926) सहभागी झाले. 1926 मध्ये त्यांनी व्हॉईसराईच्या ट्रेनमध्ये असलेला खजीना लुटला. लाला लाजपतराय यांच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी 1928 मध्ये इंग्रज अधिकारी सँडर्स याला गोळी घातली.
भगत सिंह सुखदेव आणि राजगुरु या तिघांनी मिळून हिंदुस्तान रिपब्लिकन सोशलिस्ट असोशिएशन (HRSA) स्थापन केली. भारताला स्वातंत्र्य मिळवून देणे आणि समाजवादी विचारांचे पालन करणे असे या असोशिएशनचे उद्दीष्ट होते. चंद्रशेखर हे पोलिसांसाठी एक भीती ठरले होते. त्यामुळेच ब्रिटीश पोलीस त्यांना जिंवत अथवा मृत पकडू इच्छित होते. (हेही वाचा, Fact Check: क्रांतिकारक सरदार भगत सिंह, राजगुरु, सुखदेव यांना खरोखरच 14 फेब्रुवारी या दिवशी झाली होती फाशी? जाणून घ्या व्हॅलेंटाईन डे आणि ब्लॅक डे यातील सत्यता)
27 फेब्रुवारी 1931 या दिवशी चंद्रशेखर आजाद यांना अल्फ्रेड पार्क अल्लाह येथे दोन मित्रांना भेटण्यास आले होते. मात्र या मित्रांनी त्यांना धोका दिला. त्यांनी इंग्रजांना आजाद इथे येणार असल्याची खबर दिली. पोलिसांनी त्या परिसराला वेढा घातला. त्यांनी आजाद यांना शरण येण्यास सांगितले. मात्र, आजाद यांनी त्यास नकार दिला. पोलिसांनी गोळीबार केला. पण आजाद यांनी या गोळीबारावरुद्धही प्रतिगोळीबार करत सशस्त्र लढा दिला. त्यांनी प्रत्युत्तरादाखल केलेल्या गोळीबारात 3 पोलीस मारले गेले. मात्र, जेव्हा इथून बाहेर पडणे अशक्य आहे असे आझाद यांच्या ध्यानी आले तेव्हा त्यांनी स्वत:वर गोळी झाडली आणि ते कायमचे आजाद झाले.