Adhik Maas 2020: 'अधिक अश्विन मास' ला आजपासून सुरूवात; जाणून घ्या त्याचं महत्त्व
Lord Vishnu (Photo Credits: Youtube)

काल सर्वपित्री अमावस्या झाल्यानंतर आता आज (18 सप्टेंबर) पासून हिंदू वर्षामध्ये अधिक मास (Adhik Maas) ला सुरूवात झाली आहे. हा अधिक महिना 'मल मास' किंवा 'पुरूषोत्तम मास'(Purushottam Maas) म्हटला जातो. अधिक मास हा दर 3 वर्षांनी एकदा येतो. हिंदू धर्माच्या मान्यतेनुसार, या अधिक महिन्याच्या काळामध्ये शुभ कार्य व्यर्ज्य केलेली असतात. त्यामुळे विवाह, नव्या वस्तूंची खरेदी, गृह प्रवेश अशी मंगल कार्य टाळली जातात. मात्र या अधिक मासात पूजा-पाठ, दान करून पुण्याई मिळवणं हितकारी असल्याचं म्हटलं जातं. अधिक महिना हा भगवान विष्णू आणि शिव यांच्यासाठी समर्पित केलेला आहे. असे देखील समजले जाते. यंदा 17 सप्टेंबर दिवशी पितृपंधवड्याची सांगता होऊनही शारदीय नवरात्र महिनाभर पुढे का जाणार?

अधिक मास म्हणजे काय?

सर्वसामान्यपणे भारतीय हिंदू कालदर्शिका या सूर्य मास आणि चंद्र मास यांच्या गणनेनुसार असतो. अधिक महिना हा चंद्र मासाचा अतिरिक्त भाग असतो. जो सुमारे प्रत्येक 32 महिना 16 दिन आणि 8 तासांच्या अंतराने येतात. अधिक महिना हा सूर्य वर्ष आणि चंद्र वर्ष यांच्यामधील अंतराचं संतुलन ठेवण्यासाठी बनवला आहे. भारतीय गणना पद्धतीनुसार, प्रत्येक सूर्य वर्ष 365 दिवसांचं आणि सुमारे 6 तासांचं असते. तर चंद्र वर्ष 354 दिवसांचे मानले जाते. या दोन्ही वर्षांमध्ये साधारण 11 दिवसांचा फरक असतो. तो प्रत्येक 3 वर्षांमध्ये सरासरी महिन्याभराचा असतो. हेच अंतर कमी करण्यासाठी 3 वर्षामध्ये एक चंद्र मास वाढवला जातो. त्याला अधिक मास म्हणतात.

अधिक मास सुरूवात आणि शेवट कधी?

ग्रेगेरियन कॅलेंडर नुसार, 18 सप्टेंबर पासून अधिक महिन्याला सुरूवात होणार आणि हा 16 ऑक्टोबर 2020 दिवशी संपणार आहे.

अधिक महिन्यात काय कराल, काय टाळाल?

  • अधिक महिन्यात शुभ कार्य टाळा.
  • मांसाहार टाळा.
  • अंदाजे 3 वर्षाने एकदा येणार्‍या या काळात जो पुण्य कर्म, , दान धर्म करतो त्याला हा फलदायी ठरतो.
  • अधिक अश्विन महिन्याला आजपासून प्रारंभ होत असून, या काळात श्री विष्णू उपासनेला विशेष महत्व आहे.

धार्मिक कहाणींमध्ये सांगितलेल्या गोष्टीनुसार, हिंदू कालगणनेमध्ये प्रत्येक महिन्याला एक विशेष स्वामी देवता असते. मात्र अधिक महिना अतिरिक्त असल्याने त्याला कोणी स्वामी नव्हता. जेव्हा याबाबत अधिक मासाने आपली व्यथा भगवान विष्णूकडे मांडली तेव्हा त्यांनी या महिन्याला स्वतःचं नाव देत अधिक मास 'पुरूषोत्तम मास' असेल असे सांगितले. आणि स्वतः त्याचं स्वामित्त्व स्वीकारले. त्यामुळे अधिक महिन्यात भगवान विष्णूची उपासना केली जाते.

(टीप: वरील लेख हा केवळ माहिती देण्याच्या उद्देशाने लिहला आहे. कोणत्याही धार्मिक भावना दुखावण्याचा, अंधश्रद्धा पसरवण्याचा लेटेस्टली मराठीचा उद्देश नाही. )