राष्ट्रीय गुन्हे नोंदणी विभागाने (एनसीआरबी) (National Crime Records Bureau) 2018 या वर्षातील देशातील आत्महत्यांचे आकडे जाहीर केले आहेत. 2018 या वर्षात दर चार मिनिटाला एका व्यक्तीने आत्महत्या करून आपले जीवन संपवले आहे. या आकडेवारीवरून देशभरात शेतकऱ्यांपेक्षा बेरोजगारांनी अधिक आत्महत्या केल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. एनसीआरबी दरवर्षी देशातील गुन्हे आणि त्यांच्याशी निगडीत घटनांची आकडेवारी जाहीर करत असते. 2018 या वर्षात बेरोजगारीमुळे देशभरातील 12 हजार 936 लोकांनी आत्महत्या करून आपलं जीवन संपवलं. तसेच कर्ज आणि शेतीच्या संबंधित कारणांमुळे 10 हजार 349 जणांनी आत्महत्येचा पर्याय निवडला. 'टाइम्स ऑफ इंडिया' या इंग्रजी वृत्तपत्राने याबाबतचे वृत्त दिले आहे.
एनसीआरबीच्या आकडेवारीनुसार, 2018 मध्ये 5 हजार 763 शेतकऱ्यांनी आणि 4 हजार 586 शेतमजुरांनी आत्महत्या केली. यात 5 हजार 457 पुरुष शेतकरी आणि 306 महिला शेतकऱ्यांचा समावेश होता. तसेच देशात 2018 या वर्षात आत्महत्येच्या घटनांमध्ये 3.6 टक्क्यांनी वाढ झाली आहे. बेरोजगारांच्या आत्महत्यांमध्ये 82 टक्के पुरुषांचा समावेश आहे. यात केरळमध्ये 1585, तामिळनाडू 1579, महाराष्ट्र 1260, कर्नाटक 1094 आणि उत्तर प्रदेश 902 या राज्यांमध्ये सर्वाधिक बेरोजगारांच्या आत्महत्येची नोंद करण्यात आली आहे. (हेही वाचा - वाशिममध्ये कर्जबाजारी शेतकऱ्याची विद्युत तारेला पकडून आत्महत्या)
2017 मध्ये 12 हजार 241 जणांनी बेरोजगारीला कंटाळून आत्महत्या केली. तसेच शेती संबंधित आलेल्या संकटामुळे 10 हजार 655 शेतकऱ्यांनी आत्महत्येचा पर्याय निवडला. एनसीआरबीने जाहीर केलेली वरील आकडेवारी धक्कादायक आहे. 2018 मध्ये देशभरात झालेल्या आत्महत्यांमध्ये 7.7 टक्के आत्महत्या या शेतकऱ्यांच्या आहेत. त्यामुळे भाजप सरकारचे 'अच्छे दिन' हे आश्वासन फोल ठरले आहे.