Arun Jaitley यांच्या व्यक्तिगत व राजकीय जीवनाचा आढावा, वाचा सविस्तर
Senior BJP Leader, Former Union Finance Minister Arun Jaitley | (Photo Credits: PTI)

Arun Jaitley Personal Life, Education and Political Career: भारतीय जनता पक्षाचे (BJP) ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली (Arun Jaitley), यांचे आज 24 ऑगस्ट रोजी प्रदीर्घ आजारानंतर आज दिल्ली येथील AIIMS रुग्णालायात निधन झाले आहे. वयाच्या 66 व्या वर्षी जेटली यांनी अखेरचा श्वास घेतला. जेटली यांची आजवरची राजकीय कारकीर्द बरीच प्रदीर्घ होती ज्यात ते  एक आश्वासक आणि  हसतमुख चेहरा म्हणून ओळखले जात. आपल्या आक्रमक, प्रवाही भाषणाने आणि गतीमान कार्यशैलीने विरोधकांसह स्वपक्षीय तसेच जनतेवर छाप सोडणारे असे हे व्यक्तीमत्व, त्यांच्या निधनाने राजकीय वर्तुळात एका प्रकारची पोकळी निर्माण झाली आहे. अरुण जेटली यांचे व्यक्तिगत जीवन (Personal Life), शिक्षण (Education) आणि त्यांच्या राजकीय (Political Career) कारकीर्दीचा हा आढावा..

अरुण जेटली शिक्षण

किशन जेटली आणि रतन प्रभा जेटली या दाम्पत्याच्या पोटी अरुण जेटली यांचा जन्म झाला. त्यांचे वडील निष्णात वकील होते. त्यामुळे शिक्षण आणि सामाजिक भान त्यांना बालपणापसूनच आले. नवी दिल्ली येथील सेंट जेवियर्स स्कूलमधून त्यांनी प्राथमिक शिक्षण पूर्ण केले. 1973 मध्ये त्यांनी श्री राम कॉलेज ऑफ कॉमर्स, नवी दिल्ली येथून वाणिज्य शाखेतून पदवी घेतली. तर 1977 मध्ये त्यांनी दिल्ली विद्यापीठातून कायद्याचे शिक्षण घेतले. महाविद्यालयीन जीवनापासूनच सामाजिक कार्यात रस असलेले जेटली 1974 मध्ये दिल्ली विद्यापीठातील विद्यार्थी संघटनेचे अध्यक्षही राहले आहेत.

अरुण जेटली कौटुंबीक जीवन

अरुण जेटली यांनी 24 मे 1982 रोजी संगीता जेटली यांच्याशी विवाह केला. त्यांना मुलगा रोहन आणि मुलगी सोनाली अशी दोन मुलं आहेत.

Senior BJP Leader, Former Union Finance Minister Arun Jaitley | (Photo Credits: PTI)

अरुण जेटली यांचा राजकीय प्रवास

अरुण जेटली यांना सुरुवातीपासूनच राजकारणात रस राहिला. मात्र, 1991 मध्ये त्यांनी भारतीय जनता पक्षाशी स्वत:ला जोडून घेतले. पुढील काही वर्ष सामान्य कार्यकर्ता म्हणून त्यांनी पक्षकार्य त्यांच्यावर 1999 मध्ये त्यांच्यावर भाजप पक्ष प्रवक्ता पदाची जबाबदारी आली. दरम्यान, 1999 मध्ये अटल बिहारी वाजपेयी सरकार सत्तेवर आले. हे सरकार विविध राजकीय पक्षांनी एकत्र येऊन तयार केलेले आघाडी सरकार होते. या सरकारमध्ये जेटली यांनी 13 ऑक्टोबर 1999 मध्ये माहिती आणि प्रसारण राज्य मंत्री म्हणून स्वतंत्र कार्यभार हाती घेतला. त्यांच्याकडे गुंतवणूक राज्यमंत्री पदाचा कार्यभारही होता. दरम्यान, वाजपेयी मंत्रीमंडळातील मंत्री राम जेठमलानी यांनी 23 जुलै 2000 मध्ये आपल्या कायदा आणि न्याय मंत्रिपदाचा राजीनामा दिला. त्यामुळे जेटली यांनी कायदा, न्याय आणि कंपनी प्रकरणांचा अतिरिक्त कार्यभारही सांभाळला. जेटली यांनी नोव्हेंबर 2000 मध्ये कॅबिनेट मंत्री म्हणून मंत्रिपदाची शपथ घेतली. पुढे त्यांच्या कार्याचा आलेख वाढतच गेला.

भाजपचा पराभव आणि सत्तावापसी

पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखालील एनडीएप्रणीत भाजप सरकारचा 2004 मधील लोकसभा निवडणुकीत पराभव झाला. त्यानंतर अरुण जेटली यांच्याकडे भाजपच्या महासचिव (Secretary-General) पदाची जबाबदारी आली. दरम्यान, 3 जून 2009 रोजी भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनी अरुण जेटली यांच्या नावाची राज्यसभेतील विरोधी पक्षनेते अशी घोषणा केली. त्यामुळे 16 जून 2009 रोजी त्यांनी पक्षाच्या महासचिव पदाचा राजीनामा दिला. विरोधी पक्ष नेता म्हणून राज्यसभेत त्यांची कामगिरी चांगली राहीली. त्यांनी अनेक विधेयकांवर महत्त्वपूर्ण भाषणं केली. पक्षाची बाजू मांडली. तसेच, रामलीला मैदानावर झालेल्या समाजसेवक अण्णा हजारे यांच्या आंदोलनाचे जोरदार समर्थनही केले. विशेष म्हणजे अरुण जेटली यांनी 2014 पर्यंत लोकसभेची थेट निवडणूक कधीच लढवली नाही. त्याची अनेक कारणं सांगितली जातात. पण नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपने लढलेल्या 2014 च्या निवडणुकीत त्यांनी अमृतसर लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी केली. तोपर्यंत या मतदारसंघातून भाजपचे तत्कालीन नेते आणि माजी क्रिकेटपटू नवजोत सिंह सिद्धू लढत असत. (सिद्धू आता काँग्रेसमध्ये आहेत.) मात्र, या निवडणुकीत (2014) काँग्रेस उमेदवार अमरिंदर सिंह यांच्याकडून पराभूत झाले. पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली त्यांनी 26 मे 2014 मध्ये त्यांनी केंद्रीय अर्थमंत्री म्हणून शपथ घेतली.

Senior BJP Leader, Former Union Finance Minister Arun Jaitley | (Photo Credits: PTI)

केंद्रीय मंत्रिपद

अरुण जेटली यांची केंद्रीय अर्थमंत्री म्हणून कामगिरी संमिश्र राहिली. नोटबंदी, जीएसटी हे त्यांच्या कार्यकाळातील अर्थव्यवस्थेशी संबंधीत सर्वात मोठे निर्णय ठरले.

अरुण जेटली यांचा सत्तात्याग

अरुण जेटली हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली एडीए 1 सरकारमध्ये केंद्रात अर्थमंत्री होते. मात्र, गेले काही काळ ते सतत आजारी असल्याने त्यांनी स्वत:हूनच पंतप्रधान मोदी यांना पत्र लिहीले होते. या पत्रात त्यांनी आपण प्रकृती अस्वास्थ्याच्या कारणास्तव मंत्रीमंडळात सहभागी होत नसल्याचे म्हटले होते. पंतप्रधान मोदी यांना लिहीलेले पत्र जेटली यांनी आपल्या ट्विटर हँडलवरुन पोस्ट केले होते. या पत्रात 'गेल्या 18 महिन्यांपासून माजी प्रकृती ठिक नाही. गेल्या काही काळात ती अधीकच बिघडली आहे. आपण निवडणूक प्रचार काळात केदारनाथ जाण्यासाठी निघाले होतात तेव्हाच मी आपल्याला माझ्या प्रकृतीसंबंधी माहिती दिली होती. त्यामुळे मला माझ्या जबाबदारीतून मुक्त करावे. जेणेकरुन मी माझ्या आरोग्याकडे अधिक चांगले लक्ष देऊ शकेल.', असे जेटली यांनी म्हटले होते. दरम्यान, या पत्रानंतर 30 मे रोजी पंतप्रधान मोदी आणि त्यांच्या मंत्रिमंडळाने शपथग्रहण केली होती.

आज, दिल्ली येथे त्यांची प्राणज्योत मालवली आहे, भारतीय राजकारणात महत्वाची कामगिरी बजावलेल्या अरुण जेटली यांना लेटेस्टली मराठी कडून भावपूर्ण श्रद्धांजली!