कोवॅक्सिन (COVAXIN) या भारतीय बनावटीच्या कोविड प्रतिबंधात्मक लसीला आता जागतिक आरोग्य संघटनेकडून (WHO) मान्यता मिळवण्याच्या प्रक्रियेमध्ये लस निर्माते आता एक पाऊल पुढे गेले आहेत. हैदराबादच्या भारत बायोटेक कंपनीने आयसीएमआरच्या सोबतीने कोवॅक्सिनची निर्मिती केली आहे. दरम्यान WHO ने आता भारत बायोटेक कडून देण्यात आलेलं एक्सप्रेशन ऑफ इंटरेस्ट (EoI) स्वीकारलं आहे. हे आपत्कालीन वापराच्या मंजुरीसाठी आवश्यक असते. सध्या या अहवालाची माहिती जागतिक आरोग्य संघटनेच्या वेबसाईटवर अपलोड करण्यात आली आहे.
दरम्यान जागतिक आरोग्य संघटनेला आता भारत बायोटेक कडून फेझ 3 चा संपूर्ण डाटा मिळण्याची प्रतिक्षा आहे. फेझ 3 मध्ये भारतामध्ये अंदाजे 25 हजार उमेदवारांवर क्लिनिकल ट्रायल्स झाल्या आहेत. प्राथमिक अहवालामध्ये कोवॅक्सिन 78% प्रभावी असल्याचं समोर आलं आहे. भारतामध्ये Drugs Controller General of India (DCGI) ने कोवॅक्सिनच्या आपत्कालीन वापराला देशात 3 जानेवारीलाच परवानगी दिली आहे. सध्या भारतामध्ये कोवॅक्सिनच्या बरोबरीने कोविशिल्ड आणि स्फुटनिक वी या 2 लसी उपलब्ध आहेत.
मागील काही दिवसांपासून कोवॅक्सिन वरून देशा-परदेशात चर्चा आहे. अमेरिकेनेही कोवॅक्सिनला आपत्कालीन वापराच्या मंजुरीसाठी सध्या मंजूरी दिलेली नाही तसेच कोवॅक्सिन घेतलेल्यांवर परदेश प्रवासावर बंधनं आहेत त्यामुळे जर जागतिक आरोग्य संघटनेने कोवॅक्सिनला हिरवा कंदील दिला तर अनेकांना त्याचा फायदा मिळणार आहे. काहींच्या मनातून शंकेचं निरासन होईल. COVAXIN कोविड प्रतिबंधक लशीमध्ये नवजात वासराच्या रक्तामधील अंश वापरला असल्याच्या वायरल वृत्तावर केंद्र सरकार कडून स्पष्टीकरण.
कोवॅक्सिन भारतासह 10 अजून देशांनी आपत्कालीन वापरासाठी मंजूर केली आहे. त्यामध्ये इराण, मालदिव्स, मेक्सिको, नेपाळ यांचा समावेश आहे. पण अमेरिका, ब्रिटन, न्युझिलंड, रशिया, सौदी अरेबिया, चीन, ऑस्ट्रेलिया येथे कोवॅक्सिन मंजूर झालेली नाही.