US Rejected 31% of MDH Exports: सिंगापूर आणि हाँगकाँगमधील एव्हरेस्ट (Everest) आणि एमडीएचच्या (MDH) मसाल्यांमध्ये इथिलीन ऑक्साईडचे घटक आढळून आले. यानंतर दोन्ही देशांनी या ब्रँडच्या मसाल्यांची आयात बंद केली आहे. इथिलीन ऑक्साईडमुळे कर्करोगासारखे आजार होण्याचा धोका असतो. त्यानंतर आता अमेरिका या मसाल्यांची विक्री बंद करू शकते. यूएस फूड अँड ड्रग ॲडमिनिस्ट्रेशन (FDA) भारतीय मसाल्यांमध्ये परवानगी असलेल्या मर्यादेपेक्षा जास्त प्रमाणात इथिलीन ऑक्साईड आहे का, याचा तपास करत आहे.
अशात मसाल्यांच्या ब्रँड एमडीएचच्या अमेरिकेतील निर्यातीशी संबंधित नवीन माहिती समोर आली आहे. गेल्या सहा महिन्यांत, यूएस सीमाशुल्क अधिकाऱ्यांनी एमडीएचने निर्यात केलेल्या 31 टक्के शिपमेंट्स स्वीकारण्यास नकार दिल्याची माहिती मिळाली आहे.
इंडियन एक्सप्रेसच्या अहवालानुसार, अमेरिकेने एमडीएच शिपमेंट स्वीकारण्यास नकार दिल्याची प्रकरणे ऑक्टोबर 2023 पासून दुप्पट झाली आहेत. यूएस फूड अँड ड्रग ॲडमिनिस्ट्रेशनच्या डेटावरून असे दिसून आले आहे की, ऑक्टोबर 2022 ते सप्टेंबर 2023 दरम्यान हा नकार दर 15 टक्के होता, जो आता जवळपास 31 टक्क्यांपर्यंत वाढला आहे. ऑक्टोबर 2020 पासून एमडीएच शिपमेंट नाकारण्याचे कारण ‘साल्मोनेला’ असे देण्यात आले. हा एक जीवाणू आहे, ज्याने शरीरात प्रवेश केल्याने अतिसार आणि ताप यांसारख्या समस्या उद्भवू शकतात. हे आतड्यांना देखील हानी पोहोचवू शकते.
अन्न सुरक्षा तज्ज्ञांच्या मते, कापणीपासून ते प्रक्रिया आणि पॅकेजिंगपर्यंत स्वच्छता राखल्यास साल्मोनेला होऊ शकत नाही. आर्थिक वर्ष 2023 मध्ये एमटीआर मसाल्यांच्या निर्यातीत 1 टक्के नकार दर दिसून आला. याचे कारणदेखील साल्मोनेला बॅक्टेरिया असल्याचे सांगण्यात आले. 2023 मध्येच, अहमदाबादस्थित रामदेव फूड प्रॉडक्ट्स प्रायव्हेट लिमिटेडने निर्यात केलेल्या उत्पादनांमध्ये 2 टक्के नकार दर दिसून आला. 2024 मध्ये तो 3 टक्क्यांपर्यंत वाढला आहे. (हेही वाचा: Spain : व्हेंडिंग मशीनच्या कॉफीमध्ये आढळले कीटक; महिला प्रवाशाचा थोडक्यात वाचला जीव, पाल्मा विमानतळावरील घटना)
दरम्यान, अलीकडे हाँगकाँगने दोन प्रसिद्ध भारतीय मसाला ब्रँड एव्हरेस्ट आणि एमडीएचवर बंदी घातली आहे. या मसाल्यांमध्ये कर्करोगास कारणीभूत कार्सिनोजेनिक 'कीटकनाशके' असल्याचा आरोप केला गेला आहे. सिंगापूरनेही एव्हरेस्टचा फिश करी मसाला बाजारातून मागे घेण्याचे निर्देश दिले होते. याआधी एफडीएने जानेवारी 2022 मध्ये एमडीएचच्या मॅन्युफॅक्चरिंग प्लांटची तपासणी केली. प्लांटमध्ये पुरेशा स्वच्छतेच्या सुविधा नसल्याचे आढळून आले होते.