लोकशाही भारताचा मूलाधार ठरलेल्या भारतीय संविधानाच्या स्वीकार दिनाच्या स्मरणार्थ देशभरात २६ नोव्हेंबर हा संविधान दिन म्हणून साजरा करण्यात येतो. शासकीय कार्यालये, न्यायसंस्था, शैक्षणिक संस्था तसेच विविध सामाजिक संघटनांकडून घटनावाचन, शपथ विधी, व्याख्याने आणि जनजागृती कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येतात. २६ नोव्हेंबर १९४९ रोजी भारताच्या संविधान सभेने भारतीय राज्यघटना (संविधान) औपचारिकरित्या स्वीकारली, त्या ऐतिहासिक दिवसाच्या स्मरणार्थ हा दिवस संविधान दिन म्हणून पाळला जातो.पूर्वी हा दिवस ‘राष्ट्रीय विधी दिन’ म्हणून ओळखला जात होता; तथापि 2015 साली केंद्र सरकारने राजपत्र अधिसूचनेद्वारे २६ नोव्हेंबर हा दिवस अधिकृतपणे ‘संविधान दिन’ म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला. सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्रालयाने 19 नोव्हेंबर 2015 रोजी यासंबंधी अधिसूचना काढत नागरिकांमध्ये घटनात्मक मूल्यांचा प्रसार हा मुख्य उद्देश असल्याचे स्पष्ट केले.
संविधान दिनाचे महत्व
न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या संविधानातील मूलभूत तत्त्वांविषयी नागरिकांमध्ये जागृती करणे हा संविधान दिनाचा मुख्य हेतू आहे.
तरुण पिढीत घटनात्मक मूल्ये रुजवणे, नागरिकांचे मूलभूत अधिकार आणि कर्तव्ये समजावून देणे, तसेच लोकशाही, धर्मनिरपेक्षता आणि सामाजिक न्यायाची जाणीव वाढवणे यासाठी हा दिवस महत्त्वाचा मानला जातो.
२६ नोव्हेंबरच का?
- भारतीय संविधानाचा मसुदा जवळपास २ वर्षे ११ महिने १८ दिवसांच्या चर्चेनंतर तयार होऊन २६ नोव्हेंबर १९४९ रोजी स्वीकारला गेला.
- संविधान स्वीकारल्यानंतरही ते पूर्णपणे लागू होण्यासाठी काही काळ ठेवण्यात आला आणि २६ जानेवारी १९५० रोजी ते अमलात आले, म्हणून २६ जानेवारीला प्रजासत्ताक दिन आणि २६ नोव्हेंबरला संविधान दिन साजरा होतो