युक्रेनच्या पूर्व भागात अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. परराष्ट्र मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, ऑपरेशन गंगा अंतर्गत आतापर्यंत 18,000 भारतीय नागरिकांना युक्रेनमधून सुरक्षितपणे भारतात आणण्यात आले आहे. गेल्या 24 तासांत 15 उड्डाणे भारतात आली आहेत. पुढील 24 तासांसाठी 18 उड्डाणे युक्रेनला पाठवली जातील. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी ही माहिती दिली. आता भारतीय संरक्षण मंत्रालयाने खार्किव, युक्रेन येथे भारतीय नागरिकांसाठी ग्राउंड नियम, काय करावे, करू नये तसेच मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत.
संभाव्य धोकादायक/कठीण परिस्थिती अपेक्षित-
- हवाई हल्ले, विमान/ड्रोन्सद्वारे होणारे हल्ले
- क्षेपणास्त्र हल्ले
- उखळी बॉम्बहल्ला
- लहान शस्त्रे / गोळीबार
- ग्रेनेड स्फोट
- मोलोटोव्ह कॉकटेल (स्थानिक लोक/बिगर व्यावसायिक सैनिक सह)
- इमारत कोसळणे
- पडणारा ढिगारा
- इंटरनेट जॅमिंग
- वीज/अन्न/पाण्याची टंचाई
- गोठण बिंदूखालील तापमानाला तोंड द्यावे लागणे
- मानसिक आघात/गोंधळून जाणे
- जखमा /वैद्यकीय मदतीचा अभाव
- वाहतुकीचा अभाव
- सशस्त्र सेनानी/लष्करी कर्मचार्यांबरोबर थेट सामना
मूलभूत नियम/काय करावे
- माहिती संकलित करा आणि आपल्या सहकारी भारतीयांबरोबर सामायिक करा
- मानसिकदृष्ट्या खंबीर रहा/घाबरू नका
- दहा भारतीय विद्यार्थ्यांच्या छोट्या गटात/पथकांमध्ये स्वत:ला संघटित करा/त्यात मित्र/जोडी बनवा /दहा व्यक्तींच्या प्रत्येक गटात एक समन्वयक आणि एक उप समन्वयक नियुक्त करा
- तुमची उपस्थिती आणि ठावठिकाणा तुमच्या मित्र/लहान गट समन्वयकाला नेहमी माहीत असायला हवा
- व्हॉट्सअॅप ग्रुप बनवा, तपशील, नावे, पत्ता, मोबाइल नंबर आणि भारतातील संपर्क क्रमांक संकलित करा/दुतावासात किंवा नवी दिल्लीतील नियंत्रण कक्षाशी व्हॉट्सअॅपवर भौगोलिक स्थान शेअर करा/दर 8 तासांनी माहिती अपडेट करा/वारंवार मोजणी करा (दर 8 तासांनी) /गट/पथक समन्वयकांनी त्यांचे स्थान नियंत्रण कक्ष/हेल्पलाइन क्रमांकावर कळवावे.
- फोनची बॅटरी वाचवण्यासाठी फक्त समन्वयक/उप समन्वयकांनी भारतातील स्थानिक अधिकारी/दूतावास/नियंत्रण कक्षांशी संवाद साधावा. (हेही वाचा: Russia-Ukraine War: आतापर्यंत 18 हजार भारतीयांनी युक्रेन सोडल्याची पराराष्ट्र मंत्रालयाची माहिती)
खडतर स्थितीत तग धरून राहण्यासाठी मार्गदर्शक सूचना
- अत्यावश्यक वस्तूंचे एक छोटेसे किट व्यक्ती जवळ किंवा हातात चोवीस तास तयार ठेवा
- आपत्कालीन किटमध्ये पासपोर्ट, ओळखपत्र, अत्यावश्यक औषधे, जीवरक्षक औषधे, टॉर्च, काडेपेटी , लायटर, मेणबत्त्या, रोख रक्कम, एनर्जी बार, पॉवर बँक, पाणी, प्रथमोपचार किट, हेडगियर, मफलर, हातमोजे, उबदार जॅकेट, मोजे आणि बुटांचा जोड असावा
- अन्न आणि पाणी जपून वापरा आणि एकमेकांसोबत वाटून घ्या. पूर्ण जेवण टाळा, अन्नधान्य बरेच दिवस पुरावे यासाठी थोडे थोडे खा. भरपूर पाणी प्या. जर तुम्ही स्वतः मोकळ्या जागेत/शेतात असाल तर, पाणी तयार करण्यासाठी बर्फ वितळवा
- उपलब्ध असल्यास, पाऊस/थंडी/वादळ/बचावा दरम्यान सतरंजी /कव्हर म्हणून वापरण्यासाठी प्रति व्यक्ती एक मोठी गार्बेज बॅग जवळ ठेवा
- जखमी किंवा आजारी असल्यास - नियंत्रण कक्ष/हेल्पलाइन/व्हॉट्सअॅप कडून सल्ला घ्या
- मोबाईलमधील सर्व अनावश्यक अॅप्स हटवा, बॅटरी वाचवण्यासाठी संभाषण कमी आवाजात /ऑडिओ मोडवर मर्यादित करा
- घरामध्येच राहा, शक्यतो निर्धारित केलेली सुरक्षित क्षेत्रे, तळघर, बंकर.इ .
- जर तुम्ही स्वत: रस्त्यावर असाल तर रस्त्यांच्या कडेला, इमारतींच्या कडेकडेने चाला, लक्ष्य बनू नये म्हणून खाली वाकून जा, रस्ते ओलांडू नका, शहराच्या मध्यवर्ती भागात जाणे टाळा. शहरी भागातील रस्त्यांच्या कोपऱ्यांवर अत्यंत सावधगिरीने बाहेर वळा.
- प्रत्येक नियुक्त गट/पथकात, एक पांढरा ध्वज/पांढरे कापड बावटा म्हणून ठेवा
- रशियन भाषेत दोन किंवा तीन वाक्ये शिका (उदा., आम्ही विद्यार्थी आहोत, आम्ही आंदोलक नाही, कृपया आम्हाला नुकसान पोहचवू नका, आम्ही भारतीय आहोत)
- रशियन भाषेतील काही वाक्ये :
- Я студентизИндии (मी भारतातील विद्यार्थी आहे)
- Я некомбатант (मी आंदोलक नाही )
- Пожалуйстапомогите (कृपया मला मदत करा)
- एकाच जागी थांबावे लागले असताना, रक्ताभिसरण चांगले राहण्यासाठी नियमित दीर्घ श्वासोच्छवासाचा हलका व्यायाम करा
- कमीत कमी वैयक्तिक सामान (आपत्कालीन किट व्यतिरिक्त) शक्यतो लांब ट्रेक/चालण्यासाठी योग्य असलेल्या छोट्या बॅकपॅकमध्ये पॅक करा.
- अचानक सूचना मिळाली तर निघण्यासाठी तयार रहा/हालचाली मंद होतील , थकवा येईल अशा आणि गर्दी टाळण्यासाठी मोठ्या बॅग बाळगू नका
- मिलिटरी चेकपोस्टवर किंवा पोलिस/सशस्त्र कर्मचारी/मिलिशियाने थांबवले तर - सहकार्य करा/आज्ञा पाळा /तुमच्या खांद्यांच्या वर उघड्या तळव्याने हात वर करा/नम्र रहा/आवश्यक माहिती द्या/शक्य असेल
- नियंत्रण कक्ष/हेल्पलाईनच्या मार्गदर्शनानुसार अधिकाऱ्यांच्या समन्वयाने स्थलांतर करा
काय करू नका
- तुमच्या बंकर/तळघर/निवासातून वारंवार बाहेर पडणे टाळा
- शहराच्या मध्यभागी/गर्दीच्या ठिकाणी जाऊ नका
- स्थानिक आंदोलक किंवा मिलिशियामध्ये सामील होऊ नका
- सोशल मीडियावर प्रतिक्रिया देणे टाळा
- शस्त्रे किंवा कोणताही स्फोट न झालेला दारुगोळा/ तोफगोळा उचलू नका
- लष्करी वाहने/सैन्य/सैनिक/चेक पोस्ट/मिलिशिया यांच्यासोबत फोटो/सेल्फी घेऊ नका.
- युद्धाचे थेट चित्रीकरण करण्याचे प्रयत्न करू नका
- इशारा देणार्या सायरनचा आवाज आल्यास , जेथे शक्य असेल तेथे त्वरित आश्रय घ्या. जर तुम्ही खुल्या जागी असाल तर पोटावर झोपा आणि तुमचे डोके तुमच्या बॅकपॅकने झाका
- बंदिस्त जागेत आग पेटवू नका
- अल्कोहोलचे सेवन करू नका/अंमली पदार्थांच्या गैरवापरापासून इतरांना परावृत्त करा
- चिल ब्लेन/फ्रॉस्टबाइट टाळण्यासाठी ओले मोजे घालू नका. जेथे शक्य असेल तेथे, तुमचे बूट काढून टाका आणि तुमचे मोजे आणि इतर ओले सामान वाळवा
- अस्थिर/मोडकळीला आलेल्या इमारती टाळा आणि कोसळणारा/उडणारा ढिगारा लक्षात घ्या
- स्फोट किंवा बंदुकीच्या गोळीबाराच्या वेळी हवेत उडणाऱ्या काचांच्या तुकड्यांमुळे होणारी इजा टाळण्यासाठी काचेच्या खिडक्यांपासून दूर राहा
- चेक-पोस्टवर, तुमच्याकडे मागणी केलेली नसताना अचानक तुमच्या खिशात किंवा बॅगेत वस्तू/कागदपत्रे काढण्यासाठी हात घालण्याच्या हालचाली करून सशस्त्र सैनिकांच्या मनात संशय निर्माण करू नका. सशस्त्र सैनिकांना सामोरे जाताना अचानक किंवा धक्कादायक हालचाली करू नका.
या मार्गदर्शक सूचना मनोहर पर्रिकर इन्स्टिट्युट फॉर डिफेन्स स्टडीज अँड ऍनालिसिसने तयार केल्या आहेत.