UK To Recruit Doctors from India: ब्रिटनमधील आरोग्य सेवेची अवस्था झाली बिकट; भारतातून तब्बल 2,000 डॉक्टरांची भरती करणार, जाणून घ्या सविस्तर
Doctor प्रतिकात्मक फोटो (Photo Credit: Pixabay)

ब्रिटनचे नाव घेताच आपल्या मनात एका समृद्ध देशाचे चित्र उभे राहते. इथली राष्ट्रीय आरोग्य सेवा ही जगातील सर्वोत्तम आरोग्य सेवांमध्ये गणली जाते. मात्र ही गोष्ट आहे काही वर्षांपूर्वीची. सध्या ब्रिटनमधील आरोग्य सेवेची अवस्था फारच बिकट झाली आहे. ब्रिटनमध्ये डॉक्टरांची मोठी कमतरता आहे. ही कमतरता दूर करण्यासाठी ब्रिटनने भारताची मदत मागितली आहे. ब्रिटनला भारतीय डॉक्टरांची गरज आहे. यासाठी यूके एजन्सी नॅशनल हेल्थ सर्व्हिस (NHS) ने एक उपक्रम सुरू केला आहे.

या उपक्रमांतर्गत ब्रिटन भारतातून 2 हजार डॉक्टरांची भरती करणार आहे. ही भरती जलदगतीने केली जाईल. यासाठी डॉक्टरांना भारतातच प्रशिक्षण दिले जाणार आहे. भारतातील 2000 डॉक्टरांची पहिली तुकडी, जी यूकेच्या राष्ट्रीय आरोग्य सेवेत कामावर रुजू होईल, त्यांना 6 ते 12 महिन्यांच्या पदव्युत्तर प्रशिक्षणानंतर ब्रिटनमधील रुग्णालयांमध्ये तैनात केले जाईल. प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या डॉक्टरांना ब्रिटनमध्ये नोकरी मिळविण्यासाठी व्यावसायिक आणि भाषिक मूल्यमापन मंडळ (PLAB) परीक्षेतून सूट दिली जाईल.

या कार्यक्रमांतर्गत, एनएचएसने मुंबई, दिल्ली, नागपूर, गुरुग्राम, कालिकत, बेंगळुरू, चेन्नई, इंदूर आणि म्हैसूर या भारतातील प्रमुख शहरांमधील प्रमुख खाजगी रुग्णालयांमध्ये प्रशिक्षण केंद्रे स्थापन केली आहेत. या उपक्रमाला थेट ब्रिटिश सरकारकडून निधी मिळणार असल्याचे सांगण्यात येत आहे. यातून भरती झालेल्या डॉक्टरांना कायमस्वरूपी नोकऱ्या मिळणार नसून, यातून मिळणारा अनुभव डॉक्टरांसाठी महत्वाचा असणार आहे. तसेच, भारत आणि ब्रिटन यांच्यातील ज्ञान आणि तज्ञांच्या देवाणघेवाणीचा दोन्ही देशांच्या वैद्यकीय प्रणालींना फायदा होईल. (हेही वाचा: Unilever Layoffs 2024: जगप्रसिद्ध कंपनी युनिलिव्हरमध्ये टाळेबंदीची घोषणा; जगभरातील 7,500 कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या जाणार)

एनएचएसशी संबंधित ऑर्थोपेडिक सर्जन रवी भटके म्हणतात की, एनएचएस यूकेचा परदेशी डॉक्टरांवर अवलंबून राहण्याचा मोठा इतिहास आहे. त्यांच्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांपैकी सुमारे 25 ते 30 टक्के प्रशिक्षित डॉक्टर ब्रिटिश नाहीत. दरम्यान, एनएचएसची स्थापना 5 जुलै 1948 रोजी झाली. नागरिकत्वाच्या आधारावर पूर्णपणे मोफत आरोग्यसेवा पुरविण्याची ही जगातील पहिली संस्था होती. यामुळे रुग्णालये, डॉक्टर आणि परिचारिका यांना एका सेवेखाली आणले गेले. मात्र त्याच्या स्थापनेच्या 75 वर्षांत बरेच काही बदलले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून सरकारवर एनएचएसकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप होत आहे.