जगातील प्रसिद्ध एफएमसीजी (FMCG) उत्पादने बनवणारी कंपनी युनिलिव्हर (Unilever) लवकरच मोठी नोकर कपात करणार आहे. ब्रिटिश बहुराष्ट्रीय कंपनी युनिलिव्हरने आपल्या खर्चात कपात करण्यासाठी एक नवीन कार्यक्रम सुरू करण्याची घोषणा केली आहे. युनिलिव्हरने सांगितले की, या कार्यक्रमामुळे जगभरातील कंपनीचे सुमारे 7,500 कर्मचारी त्यांच्या नोकऱ्या गमावू शकतात. युनिलिव्हरच्या एकूण कर्मचाऱ्यांपैकी हे सुमारे 1.2% असेल.
युनिलिव्हरनेही आपले आइस्क्रीम युनिट वेगळे करून नवीन कंपनी स्थापन करण्याची घोषणा केली. युनिलिव्हर मॅग्नम आणि बेन अँड जेरीसारखे लोकप्रिय आइस्क्रीम ब्रँड बनवते. पुढील तीन वर्षांत सुमारे 800 दशलक्ष युरो वाचवण्यासाठी कंपनीने जगभरातील नोकऱ्या कमी करण्याची घोषणा केली आहे. ज्या नोकऱ्यांवर कात्री लावण्यात आली आहे, त्यापैकी बहुतांश नोकऱ्या कार्यालयावर आधारित असल्याची माहिती कंपनीकडून देण्यात आली आहे. युनिलिव्हरने उत्पादन वाढवण्यासाठी आणि पैशांची बचत करण्यासाठी हा निर्णय घेतला आहे, कारण कंपनी तंत्रज्ञान क्षेत्रात गुंतवणूक करण्याचा विचार करत आहे.
या टाळेबंदीच्या निर्णयाबाबत एफएमसीजी ग्रुपने सांगितले की, यासाठी कर्मचाऱ्यांशी सल्लामसलत केली जाईल. मात्र, नेमक्या कोणत्या प्रकारची नोकरकपात होणार हे अद्याप सांगण्यात आलेले नाही. येत्या दोन वर्षांत नवीन रोजगार निर्माण होण्याची आशाही या समूहाने व्यक्त केली आहे. युनिलिव्हरचे जगभरात सुमारे 128,000 कर्मचारी आहेत. यापैकी 6,000 कर्मचारी यूकेमध्ये आहेत. (हेही वाचा: Sony Layoffs: सोनी ग्रुप 900 लोकांना कामावरून काढून टाकणार, Playstation विभागामध्ये होणार टाळेबंदी, लंडन स्टुडिओही बंद होण्याची शक्यता)
टाळेबंदीवर प्रतिक्रिया देताना, युनिलिव्हरचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणजेच सीईओ हेन शूमाकर म्हणाले, 'कंपनीची वाढ वेगाने पुढे नेण्यासाठी आम्ही अल्पावधीत बऱ्याच गोष्टी सुधारल्या आहेत. भविष्यातही आम्ही असे करण्यास कटिबद्ध आहोत. आज आम्ही जे बदल जाहीर करत आहोत ते आम्हाला कंपनीला पुढे नेण्यात आणि आमच्या योजना त्वरीत कार्यान्वित करण्यात मदत करतील.' हेन शूमाकर पुढे म्हणाले की, कंपनी आपले आइस्क्रीम युनिट बंद करण्याचा विचार करत आहे. यामध्ये मॅग्नम आणि बेन अँड जेरी या दोन्ही ब्रँडचा समावेश आहे. यामुळे कंपनीला इतर उत्पादने पुढे नेण्यात मदत होईल. युनिलिव्हर ब्रँड्समध्ये डोव्ह, मार्माइट, मॅग्नम, बेन अँड जेरी, कॉर्नेटो, हेलमन आणि पर्सिल यांचा समावेश आहे.