लडाखला (Ladakh) राज्याचा दर्जा दिला जावा आणि हिमालयातील पर्यावरणाच्या संरक्षणासाठी पाऊले उचलावीत, या मागण्यांसाठी प्रसिद्ध पर्यावरणवादी आणि शिक्षण सुधारक सोनम वांगचूक (Sonam Wangchuck) यांनी सुरू केलेले आपले उपोषण आज 21 दिवसांनंतर सोडले. उपोषण सोडले असले तरी लढा सुरूच राहिल, असा निर्धार वांगचूक यांनी स्पष्ट केला आहे. हिमालयातील (Himalaya) पर्यावरणाच्या संरक्षणाची मागणी करत सोनम वांगचूक यांनी यापूर्वीही उपोषण केले होते. यावेळी त्यांनी लडाखला संपूर्ण राज्याचा दर्जा देण्याचीही मागणी केली होती. सहा मार्चला उपोषण सुरू करतानाच वांगचूक यांनी, हे उपोषण 21 दिवसांचे असेल, असे सांगितले होते. (हेही वाचा - Sonam Wangchuk: मायनस 17 अंश सेल्सिअसमध्ये सोनम वांगचुकचे यांचे उपोषण सुरूच, लडाखला राज्याचा दर्जा देण्याची मागणी)
लडाख आणि येथील नागरिकांच्या घटनात्मक हक्कांचे संरक्षण करण्यासाठी मी माझा लढा सुरूच ठेवणार आहे, असे सांगत वांगचूक यांनी उपोषण सोडले. या 21 दिवसांत त्यांनी केवळ मीठ आणि पाण्याचे सेवन केले. उपोषण सोडताना लडाखमधील हजारो नागरिक उपोषणस्थळी जमले होते. वांगचूक यांचा लढा आम्ही पुढे सुरू ठेवू, असा निर्धार यावेळी महिलांनी व्यक्त केला.
सोनम वांगचूक हे शिक्षणतज्ज्ञ म्हणून प्रसिद्ध असून ‘थ्री इडियट्स’ चित्रपटातील ‘रँचो’ हे पात्र त्यांच्या आयुष्यावरच प्रेरित आहे. केंद्र सरकारने जनतेच्या भावनांचा विचार करून मागण्या मान्य कराव्यात, असे आवाहन वांगचूक यांनी केले. ‘‘गोठवणारे तापमान असूनही लोक आंदोलन करत आहेत. हिमालयातील वैशिष्ट्यपूर्ण पर्यावरणाचे संरक्षण करणे अत्यंत आवश्यक आहे.