
पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात (Pahalgam Terror Attack) 26 जणांचा मृत्यू झाल्यानंतर, गृह मंत्रालयाने 7 मे रोजी देशव्यापी नागरी संरक्षण मॉक ड्रिल (Civil Defence Mock Drill) करण्याचे निर्देश दिले आहेत. मुंबई, ठाणे आणि पुणे अशा महाराष्ट्रातील काही प्रमुख शहरांसह देशभरात 7 मे 2025 रोजी व्यापक स्वरूपाचे नागरी संरक्षण सराव (सिक्युरिटी मॉक ड्रिल्स) आयोजित करण्यात येणार आहेत. केंद्रीय गृह मंत्रालयाने देशातील 244 नागरी संरक्षण जिल्ह्यांमध्ये हे सराव करण्याचे निर्देश दिले असून, यामागे भारत आणि पाकिस्तानमधील वाढता तणाव कारणीभूत आहे.
याआधी 22 एप्रिल 2025 रोजी जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 26 जणांचा मृत्यू झाला होता, ज्यामुळे दोन्ही देशांमधील संबंध तणावपूर्ण बनले आहेत. या पार्श्वभूमीवर, संभाव्य हल्ल्यांपासून संरक्षणासाठी नागरिक आणि प्रशासकीय यंत्रणांना सज्ज करण्याच्या उद्देशाने हे सराव आयोजित केले जात आहेत. पोलीस, अग्निशमन दल, राष्ट्रीय आपत्ती निवारण दल (NDRF) आणि नागरी संरक्षण स्वयंसेवक यांच्या सहभागाने हे सराव राबवले जातील. यात राष्ट्रीय संनाद्य दल (NCC), राष्ट्रीय सेवा योजना (NSS), आणि नेहरू युवा केंद्र संघटना (NYK) यांचे स्वयंसेवक आणि विद्यार्थी सहभागी होतील.
कोणत्याही प्रतिकूल हल्ल्यांसाठी देशाच्या तयारीचे मूल्यांकन करण्यासाठी देशव्यापी तयारी सरावाचा भाग म्हणून, बुधवारी मॉक ड्रिल आयोजित करण्यास सांगण्यात आले आहे. सोमवारी, केंद्राने उत्तर आणि पश्चिम राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना संभाव्य युद्धकालीन परिस्थितीसाठी सज्जता वाढवण्यासाठी नागरी संरक्षण यंत्रणेची चाचणी आणि बळकटीकरण करण्याचे निर्देश दिले. या राष्ट्रीय उपक्रमाचा एक भाग म्हणून, भारतातील 259 ठिकाणी मॉक ड्रिल आयोजित केले जातील, ज्यामध्ये महाराष्ट्र हे प्रमुख राज्यांपैकी एक आहे.
महाराष्ट्रात धोरणात्मक महत्त्वाच्या आधारावर तीन वर्गीकृत झोनमध्ये मॉक ड्रिल केले जातील. श्रेणी 1 किंवा अतिसंवेदनशील क्षेत्रे म्हणजे भारताची आर्थिक राजधानी मुंबई, उरण (जेएनपीटी बंदर), तारापूर (अणुसुविधेचे ठिकाण) आहे.
श्रेणी 2 मध्ये पुणे, नाशिक, ठाणे, रोहा-नागोठणे, मनमाड, सिन्नर, पिंपरी-चिंचवड यासारख्या प्रमुख शहरांचा समावेश आहे.
श्रेणी 3 मध्ये औरंगाबाद, भुसावळ, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग यांचा समावेश आहे.
देशभरात मॉक ड्रिल्स श्रेणी 1 अंतर्गत 13 संवेदनशील झोन, श्रेणी 2 अंतर्गत 201 आणि श्रेणी 3 अंतर्गत 45 क्षेत्रांना समाविष्ट केले जाणार आहे. या सरावांचे आयोजन 1971 च्या भारत-पाकिस्तान युद्धानंतर प्रथमच इतक्या मोठ्या प्रमाणावर होत आहे. गृह मंत्रालयाने म्हटले आहे की, ‘सध्याच्या भू-राजकीय परिस्थितीत नवीन आणि जटिल धोके उद्भवले आहेत, त्यामुळे सर्व वेळी नागरी संरक्षणाची इष्टतम तयारी राखणे आवश्यक आहे.’ यापूर्वी, 4 मे रोजी पंजाबमधील फिरोजपूर छावणीत 30 मिनिटांचा ब्लॅकआउट सराव यशस्वीपणे पार पडला, ज्यामध्ये सायरनचा वापर आणि वीज पुरवठा खंडित करण्याची चाचणी घेण्यात आली. (हेही वाचा: Terror Hideout Busted in J-K's Poonch: जम्मू-काश्मीरमधील पूंछमध्ये दहशतवाद्यांचा अड्डा उद्ध्वस्त; 5 IED जप्त)
नागरिकांना या सरावांमध्ये सहभागी होण्याचे आणि स्थानिक प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. यामुळे आपत्कालीन परिस्थितीत काय करावे आणि काय करू नये याची माहिती मिळेल. विशेषतः, हवाई हल्ल्याच्या सायरनबाबत जागरूक राहणे, जवळच्या बंकर किंवा सुरक्षित ठिकाणाची माहिती ठेवणे आणि आपत्कालीन किट तयार ठेवणे यावर भर देण्यात आला आहे. 7 मे रोजी होणारे हे नागरी संरक्षण सराव भारताच्या राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहेत. भारत-पाकिस्तानमधील तणावाच्या पार्श्वभूमीवर, हे सराव नागरिक आणि प्रशासकीय यंत्रणांना संभाव्य धोक्यांपासून संरक्षणासाठी सज्ज करेल.