Retail Inflation: सर्वसामान्यांना दिलासा! किरकोळ महागाई फेब्रुवारीमधील 6.44 टक्क्यांवरून मार्चमध्ये 5.66 टक्क्यांवर
Inflation (Pic Credit: IANS)

महागाईच्या (Inflation) बाबतीत देशातील सर्वसामान्य जनतेला दिलासा मिळाला आहे. देशातील ग्राहक किंमत निर्देशांक (CPI) आधारित महागाई फेब्रुवारीमधील 6.4 टक्क्यांवरून मार्चमध्ये 5.6 टक्क्यांवर आली आहे. अशाप्रकारे मार्चमध्ये किरकोळ महागाईत घट झाली आहे. सरकारने बुधवारी जाहीर केलेल्या आकडेवारीत ही बाब समोर आली आहे. सीपीआय वस्तू आणि सेवांच्या किरकोळ किमतीतील बदलांचा मागोवा घेते. मार्च 2023 मध्ये किरकोळ महागाईचा दर 15 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर राहिला.

महागाईचा दर मुख्यत: स्वस्त खाद्यपदार्थांमुळे कमी झाला आहे. हा दर आता रिझर्व्ह बँकेच्या टॉलरन्स बँडच्या कक्षेत आला आहे. हा दर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या 6 टक्क्यांच्या अप्पर लिमिटच्या मर्यादेत आहे. चलनविषयक धोरणाचा विचार करताना, आरबीआय मुख्यत्वे किरकोळ महागाईकडे लक्ष देते.

ग्राहक किंमत निर्देशांकवर आधारित किरकोळ महागाई एका वर्षापूर्वी मार्चमध्ये 6.95 टक्के होती. राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाच्या (एनएसओ) मते, मार्चमध्ये खाद्यपदार्थांची महागाई 4.79 टक्के होती. फेब्रुवारीमध्ये हा आकडा 5.95 टक्के आणि वर्षभरापूर्वी याच कालावधीत 7.68 टक्के होता. तृणधान्ये, दूध आणि फळांच्या किमती वाढल्यामुळे किरकोळ महागाई डिसेंबर 2022 मध्ये 5.7 टक्क्यांवरून फेब्रुवारी 2023 मध्ये 6.4 टक्क्यांपर्यंत वाढण्याचा अंदाज होता. यंदा जानेवारीमध्ये किरकोळ महागाई दर तीन महिन्यांच्या उच्चांकी 6.52 टक्क्यांवर पोहोचला होता. (हेही वाचा: Richest CM In India: भारतातील सर्वात श्रीमंत मुख्यमंत्री YS Jagan Mohan Reddy; पहा त्यांची संपत्ती किती कोटी)

मार्चमध्ये भाज्यांच्या महागाईचा दर 8.51 टक्के, पेट्रोलियम उत्पादनांच्या महागाईचा दर 8.91 टक्के, गृहनिर्माण क्षेत्रातील महागाईचा दर 4.96 टक्के, कपडे आणि चपलांच्या महागाईचा दर 8.18 टक्के, डाळींच्या महागाईचा दर 4.33 टक्के होता. दरम्यान, आरबीआयने नवीन आर्थिक वर्षाच्या पहिल्या एमपीसी बैठकीत रेपो दर स्थिर ठेवण्याची घोषणा केली होती. दुसरीकडे आरबीआयने 2023-24 या आर्थिक वर्षात ग्राहक किंमत निर्देशांकावर आधारित चलनवाढ 5.2 टक्के राहण्याचा अंदाज व्यक्त केला आहे.