
एकीकडे पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती गगनाला भिडत असताना किरकोळ महागाईमध्येही (Retail Inflation) वाढ झाल्याचे समोर आले आहे. जानेवारीच्या तुलनेत फेब्रुवारी महिन्यात किरकोळ महागाई वाढली आहे. जानेवारीत किरकोळ महागाई वाढीचा 4.06 टक्के होता, तर फेब्रुवारी महिन्यात तो वाढून 5.03 टक्क्यांवर गेला. राष्ट्रीय आकडेवारी कार्यालयाने (NSO) शुक्रवारी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, अन्न व तेलाच्या किंमती वाढीमुळे किरकोळ महागाई 5.03 टक्क्यांवर गेली आहे. त्याच वेळी जानेवारीत औद्योगिक उत्पादन 1.6 टक्क्यांनी घसरले.
जानेवारीत किरकोळ महागाईचा दर 4.06 टक्के होता. ऑक्टोबर 2019 नंतरचा हा सर्वात कमी आहे. डिसेंबर 2020 मध्ये हा दर 4.59 टक्के होता, तर नोव्हेंबरमध्ये महागाईचा दर 7.6 टक्के होता. किरकोळ महागाई दरावर भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) चे विशेष लक्ष असते. या दराच्या आधारेच आरबीआय आपले चलनविषयक धोरण तयार करते. एनएसओच्या आकडेवारीनुसार अन्नधान्य चलनवाढीचा दर फेब्रुवारीमध्ये वाढून 3.87 टक्के झाला. जानेवारीत तो 1.89 टक्के होता.
फेब्रुवारीमध्ये घरांचा महागाई दर जानेवारीतील 3.25 टक्क्यांच्या तुलनेत कमी होऊन 3.23 टक्क्यांवर आला. कपडे आणि फुटवेअर महागाईचा दर 4.21 टक्क्यांवर गेला, जो जानेवारीत ते 3.82 टक्के होता. दुसरीकडे डाळींचे महागाई दर कमी झाले. फेब्रुवारीमध्ये डाळींचा महागाई दर 12. 45 टक्क्यांवर आला, तो जानेवारीत 13.39 टक्के होता. (हेही वाचा: Konkan Railway Recruitment 2021: कोकण रेल्वेत ज्युनिअर टेक्निकल असिस्टंट पदासाठी नोकर भरती, जाणून घ्या अधिक)
आयसीआरएच्या प्रधान अर्थशास्त्रज्ञ अदिती नायर म्हणाल्या, अन्नधान्य महागाईवाढीच्या मोठ्या प्रमाणात घसरणीमुळे जानेवारी 2021 मध्ये सीपीआय आधारित महागाई 16 महिन्यांच्या नीचांकी झाली. फेब्रुवारी 2021 मध्ये आतापर्यंत अन्नधान्य चलनवाढीचा संमिश्र कल दिसून आला आहे. कांद्याच्या किंमतीमध्ये वाढ, इंधनाच्या किरकोळ किंमतीतील वाढ आणि कच्च्या तेलाचे वाढते भाव या क्षेत्राकडे लक्ष देण्याची गरज आहे.