Qutub Minar: कुतुबमिनार परिसरात उत्खनन करण्याचे आदेश एएसआयला दिले नाहीत; केंद्रीय मंत्री GK Reddy यांचे स्पष्टीकरण
Qutub Minar (PC - pixahive)

केंद्रीय सांस्कृतिक मंत्री जीके रेड्डी (GK Reddy) यांनी रविवारी दिल्लीतील कुतुबमिनार (Qutub Minar) संकुलात उत्खनन होणार असल्याच्या वृत्ताचे खंडन केले. याबाबत स्पष्टीकरण देताना केंद्रीय मंत्री जीके रेड्डी म्हणाले की, असा कोणताही निर्णय झालेला नाही. याबाबत माध्यमांनी दिलेल्या अहवालांवर जीके रेड्डी यांनी सांगितले की, कुतुबमिनार परिसरात उत्खनन करण्यासाठी भारतीय पुरातत्व सर्वेक्षणाला कोणताही आदेश देण्यात आलेला नाही. वृत्तसंस्था एएनआयच्या वृत्तानुसार, रेड्डी यांनी हैदराबादमध्ये याबाबत माहिती दिली.

ज्ञानवापी प्रकरण दिवसेंदिवस गंभीर होत असताना, केंद्राने एएसआयला दिल्लीतील कुतुबमिनार परिसरात खोदकाम करण्याचे आदेश दिल्याचे वृत्त प्रसारमाध्यमांनी दिले होते. कुतुबमिनारमधील प्रतिमांचा अभ्यास करण्याचे आदेशही जारी करण्यात आल्याचे वृत्तात म्हटले आहे. मात्र, रविवारी केंद्रीय सांस्कृतिक मंत्री जीके रेड्डी यांनी हे वृत्त पूर्णपणे निराधार असल्याचे सांगितले.

काही लोकांच्या गटाला दिल्लीतील कुतुबमिनारचे नाव बदलून विष्णूस्तंभ करायचे आहे, ज्याप्रमाणे ताजमहालचे नाव बदलून तेजो महाल करण्याची मागणी होत आहे. विष्णुस्तंभ राजा विक्रमादित्यने बांधला असे या गटांचे म्हणणे आहे. तसेच कुतुबमिनारच्या जागी हिंदू आणि जैन मंदिरे असल्याचे डावे करण्यात आले आहेत. या ठिकाणी 27 मंदिरे होती, जी कुतुबुद्दीन ऐबकने नष्ट केली होती, असे या गटाचे म्हणणे आहे. (हेही वाचा: 3 मे रोजी चार धाम यात्रा 2022 सुरु झाल्यापासून 57 यात्रेकरूंचा मृत्यू; मार्गांवर होत आहे यात्रेकरूंची आरोग्य तपासणी)

इतिहासानुसार, कुतुबमिनारचे बांधकाम 1193 मध्ये दिल्ली सल्तनचा पहिला शासक कुतुबुद्दीन ऐबक याने सुरू केले होते. तो फक्त त्याचा पाया बनवू शकला. त्याचा उत्तराधिकारी इल्तुत्मिशने पुढे तीन मजली बांधली आणि 1368 मध्ये फिरोजशाह तुघलकाने पाचवा आणि शेवटचा मजला बांधला.

दरम्यान, कुतुबमिनारमध्ये शेवटचे उत्खनन 1991 मध्ये झाले होते. कुतुबमिनार संकुलाचे उत्खनन करण्याचा निर्णय घेण्यापूर्वी सांस्कृतिक सचिव गोविंद मोहन यांनी 12 जणांच्या टीमसह परिसराला भेट दिली होती. या टीममध्ये इतिहासकार, भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाचे अधिकारी तसेच संशोधकांचा समावेश होता.