तब्बल दोन वर्षांनंतर पुन्हा एकदा चारधाम यात्रा (Char Dham Yatra 2022) सुरू झाली आहे. शीखांचे पवित्र धाम असलेल्या हेमकुंड साहिबचे दरवाजेदेखील आजपासून भाविकांसाठी खुले करण्यात आले आहेत. मात्र याच दरम्यान चारधामचा खडतर प्रवास अनेक भाविकांच्या जीवावर बेतला आहे. या तीर्थयात्रेदरम्यान आतापर्यंत 57 जणांचा मृत्यू झाला असून त्यापैकी 55 जणांचा मृत्यू हार्ट अटॅकने झाला आहे. चारधाम यात्रेदरम्यान भाविकांच्या मृत्यूची प्रकरणे सातत्याने समोर येत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी हृदयविकाराच्या झटक्याने बद्रीनाथ-केदारनाथसह ऋषिकेशमध्ये 7 भाविकांना प्राण गमवावे लागले.
भाविकांच्या सततच्या मृत्यूमुळे केंद्रानेही राज्य सरकारला प्रश्न विचारला होता. आरोग्य यंत्रणा सुरळीत असल्याचे राज्य सरकारने अनेकवेळा सांगितले, मात्र त्यानंतरही मृत्यूचे प्रमाण थांबत नाही. काल केदारनाथ आणि बद्रीनाथमध्ये प्रत्येकी दोन यात्रेकरूंचा मृत्यू झाला, तर ऋषिकेशमध्ये तीन जणांचा मृत्यू झाला. यामध्ये महाराष्ट्रातील तीन, गुजरात, मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशातील प्रत्येकी एका भाविकाचा समावेश आहे.
चार धाम तीर्थ क्षेत्रांमध्ये बद्रीनाथ (उत्तराखंड), द्वारका (गुजरात), जगन्नाथ पुरी (ओरिसा), रामेश्वरम (तामिळनाडू) यांचा समावेश होतो. छोट्या चार धामांमध्ये बद्रीनाथ, केदारनाथ, गंगोत्री आणि यमुनोत्रीचा समावेश होतो. ही यात्रा सुरू झाली आहे. चार धाम यात्रा धार्मिक ग्रंथात शुभ मानली गेली आहे. चार धामच्या दर्शनाने सर्व प्रकारच्या पापांचा नाश होऊन मनुष्याला मोक्ष प्राप्त होतो असे म्हटले जाते.
दरम्यान, शीखांचे पवित्र स्थान असलेल्या हेमकुंड साहिबचे दरवाजे आज, 22 मे म्हणजेच रविवारपासून भाविकांसाठी खुले करण्यात आले आहेत. हेमकुंड साहिबचे दरवाजे आज सकाळी 10.30 वाजता भाविकांसाठी उघडण्यात आले आहेत. सुरक्षेच्या दृष्टीने एकावेळी केवळ 5 हजार भाविकांनाच दर्शन घेता येणार आहे. तत्पूर्वी शनिवारी, ‘जो बोले सो निहाल’चा जयघोष करत पंजाबहून आलेला एक गट हेमकुंड साहिबकडे रवाना झाला. (हेही वाचा: Char Dham Yatra 2022: यमुनोत्री महामार्ग बंद; 10 हजार प्रवासी, भाविक अडकले)
हेमकुंड साहिब ट्रस्टचे उपाध्यक्ष नरेंद्रजीत सिंह बिंद्रा यांनी येथील गुरुद्वारात पंज प्यारा आणि यात्रेकरूंना दुपट्टा अर्पण केला आणि घंघरियाला रवाना झाले. सुमारे दोन वर्षांनंतर पुन्हा एकदा हेमकुंड साहिबची यात्रा सुरू होत असून गोविंदघाटावरील डॉक्टरांशी सल्लामसलत केल्यानंतरच यात्रेकरूंना हेमकुंड साहिबच्या दर्शनासाठी परवानगी दिली जाणार आहे.