निवडणुकीपूर्वी नेत्यांचे पक्ष बदलणे ही गोष्ट नवी नाही. गेल्या काही वर्षांमध्ये अनेक आमदार, खासदार, मोठ मोठ्या नेत्यांनी आपला लक्ष सोडला आहे. सध्याच्या काळात या राजकीय पक्ष 'बदला'मुळे काँग्रेसला (Congress) सर्वाधिक फटका बसला आहे. एका अहवालानुसार, 2014 पासून 2021 पर्यंतची आकडेवारी दर्शवते की, काँग्रेसचे 177 खासदार आणि आमदार पक्षातून वेगळे होऊन इतर पक्षांमध्ये सामील झाले. अलीकडेच महिला काँग्रेस अध्यक्षा सुष्मिता देव यांनी पक्षाला निरोप दिला आहे. यामध्ये काँग्रेसनंतर सर्वाधिक पक्षांतर मायावतींच्या नेतृत्वाखालील बहुजन समाज पक्षामध्ये झाले आहे.
विशेष गोष्ट म्हणजे या काळात भारतीय जनता पार्टीला (BJP) सर्वात जास्त फायदा झाला. भाजप सोडणाऱ्यांची संख्याही कमी आहे आणि इतर पक्षांच्या तुलनेत आपला पक्ष सोडून भाजपमध्ये सामील होणाऱ्या नेत्यांची संख्याही अधिक आहे. गुरुवारी प्रसिद्ध करण्यात आलेल्या अहवालात याबाबत माहिती देण्यात आली आहे. असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स (ADR Report) या निवडणूक राजकारणावर नजर ठेवणाऱ्या संस्थेने केलेल्या, उमेदवारांच्या निवडणूक प्रतिज्ञापत्रांचे विश्लेषण दर्शवते की, 2014 ते 2021 दरम्यान एकूण 222 उमेदवारांनी काँग्रेस सोडली आणि इतर पक्षांमध्ये सामील झाले आणि या कालावधीत 177 खासदार आणि आमदारांनीही देशातील सर्वात जुना पक्ष सोडला.
एडीआरच्या अहवालात म्हटले आहे की, 2014 पासून 111 उमेदवार आणि 33 खासदार-आमदार भाजपमधून बाहेर पडले. याच काळात 253 उमेदवार आणि 173 खासदार आणि आमदार इतर पक्ष सोडून भाजपमध्ये सामील झाले. या सात वर्षांत विविध पक्षांचे 115 उमेदवार आणि 61 खासदार आणि आमदार काँग्रेसमध्ये सामील झाले. अहवालानुसार, गेल्या सात वर्षांत एकूण 1133 उमेदवार आणि 500 खासदार-आमदारांनी पक्ष पदाळून निवडणूक लढवली. अशाप्रकारे एकूण 35 टक्के नेत्यांनी कॉंग्रेसची साथ सोडली आहे तर भाजपसाठी ही आकडेवारी 7 टक्के आहे. (हेही वाचा: BRICS: नव्या अर्थव्यवस्थेसाठी ब्रिक्स एक अवाज- पंतप्रधान नरेंद्र मोदी)
काँग्रेसनंतर बहुजन समाज पक्ष हा असा दुसरा पक्ष आहे, जिथे मोठ्या प्रमाणावर पक्षांतर घडले. गेल्या सात वर्षांत 153 उमेदवार आणि 20 खासदार-आमदारांनी बसपा सोडली आणि इतर पक्षांमध्ये गेले. यासह, एकूण 65 उमेदवार आणि 12 खासदार-आमदार बसपमध्ये सामील झाले.