आता Toll Plaza वर वाहनांची रांग असल्यास टोल भरायची गरज नाही; NHAI ने जारी केली नवी मार्गदर्शक तत्वे
FASTag, Toll Plaza | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

टोल नाक्यावर (Toll Plaza) जर का 100 मीटरपेक्षा जास्त लांब रांग असेल, तर ही रांग 100 मीटरपेक्षा कमी होईपर्यंत वाहनांकडून टोल घेतला जाणार नाही. एनएचएआयने (NHAI) बुधवारी यासंदर्भात एक मार्गदर्शक सूचना प्रसिद्ध केली आहे. तसेच, टोल प्लाझावर पीक अवर्समध्ये प्रत्येक वाहनासाठी प्रतीक्षा वेळ जास्तीत जास्त 10 सेकंद करण्यात आली आहे, जेणेकरून वाहनचालकांना टोल प्लाझावर जास्त वेळ घालवावा लागू नये. देशात लांब पल्ल्याचा प्रवास करणाऱ्या लोकांची नेहमीच तक्रार असते की त्यांना टोल नाक्यावर जास्त वेळ घालवावा लागत आहे, मात्र आता एनएचएआयने घेतल्या निर्णयांमुळे ही समस्या दूर होऊ शकणार आहे.

एनएचएआयने जारी केलेल्या मार्गदर्शक मार्गानुसार, FASTag अनिवार्य झाल्यानंतर बहुतेक टोल नाक्यावर गाड्यांना जास्त वेळ थांबावे लागत नाही. आता कोणत्याही कारणास्तव टोल प्लाझावर वाहनाची रांग 100 मीटरपर्यंत वाढल्यास, ती रांग 100 मीटरच्या आत येईपर्यंत वाहनांकडून टोल घेतला जाणार नाही. यासाठी प्रत्येक टोल बूथपासून 100 मीटर अंतरावर पिवळी रेष आखली जाईल व या गोष्टी नियंत्रण करण्याची जबाबदारी टोल ऑपरेटरची असेल. (हेही वाचा: Fuel Price in India: मुंबई, दिल्लीसह देशभरातील प्रमुख शहरांमधील पेट्रोल, डिझेल दर)

2021 फेब्रुवारीमध्ये फास्टॅग अनिवार्य करून एनएचएआयने सर्व टोलना कॅशलेस केले आहे. एनएचएआयच्या टोल प्लाझामध्ये 96 टक्के व इतर टोल प्लाझामध्ये  99 टक्के फास्टॅगने कलेक्शन होत आहे. भविष्यात इलेक्‍ट्रानिक टोल कलेक्‍शन (ETC) लक्षात घेऊन ही व्यवस्था केली गेली आहे. फास्टॅगमुळे ड्रायव्हर आणि टोल कर्मचारी या दोघांमध्येही सामाजिक अंतराचे पालन होत आहे. एनएचएआयचा प्रयत्न आहे की राष्ट्रीय महामार्गावर प्रवाशांना एक सुरक्षित, आरामदायक आणि ट्राफिक-मुक्त प्रवासाचा अनुभव मिळावा. सध्या जवळपास 752 टोल प्लाझावर फास्टॅग अनिवार्य झाले आहेत, त्यामध्ये सुमारे 575 एनएचएआयचे आहेत.