Share Trading Fraud | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

WhatsApp Investment Scam: मुंबईतील एक 39 वर्षीय गृहिणी सायबर फसवणुकीला (Cyber Fraud Mumbai ) बळी पडली. तिने फेसबुक जाहिरातीद्वारे शोधलेल्या बनावट ऑनलाइन शेअर ट्रेडिंग (Online Share Trading Scam) योजनेत गुंतवणूक केल्यामुळे सुमारे 44 लाख रुपयांचे नुकसान झाले. तिने गुंतवणूक केली तेव्हा ती ज्या लोकांसोबत ट्रेडिंग करत आहे ते बोगस आहेत याची तिला कल्पना नव्हती. धक्कादायक म्हणजे, सार्वजनिक क्षेत्रातील बँकेत व्यवस्थापक म्हणून काम करणाऱ्या तिच्या पतीनेही या योजनेत गुंतवणूक केली होती. त्यामुळे हे जोडपे सायबर क्राईमचे (Cyber Fraud) बळी ठरले.

काय आहे प्रकरण?

पीडित महिलेने फेसबुक वापरत असताना एक जाहिरात पाहिली. ज्यावर 'आमच्याशी संपर्क साधा' असे म्हटले होते. महिलेने त्या जाहिरातीवर क्लिक केले. या क्लिकपासूनच या ऑनलाईन फ्रॉडला सुरुवात झाली. जाहिरातीवर क्लिक केल्यावर पुढच्या काहीच वेळात तिला सुनीता सिंग नावाच्या अज्ञात व्यक्तीने फोन केला. ज्याने तिला शेअर ट्रेडिंग करुन 100% नफा देण्याचे वचन दिले. शेअर मार्केटमध्ये कोणत्याही प्रकारचे नुकसान झाले तर ते नुकसान भरुन काढले जाईल, असेही आश्वासन त्याने दिले. त्यानंतर 18 एप्रिल रोजी सुनीताने तिला एक लिंक पाठवली ज्यामुळे ती "A – ज्युपिटर रिसर्च इन्स्टिट्यूट" नावाच्या WhatsApp ग्रुपमध्ये जोडली गेली. या ठिकाणी जवळपास 77 सदस्य शेअर ट्रेडिंगमधून त्यांच्या नफ्यावर चर्चा करत होते. (हेही वाचा, Financial Frauds: गेल्या 3 वर्षांत जवळपास 47 टक्के भारतीयांची झाली आर्थिक फसवणूक; UPI आणि Credit Card संबंधित प्रकरणे सर्वाधिक)

व्हर्च्युअल खात्यात 10,000 रुपये जमा

WhatsApp ग्रुपमध्ये पाच दिवसांच्या गप्पांचे निरीक्षण केल्यानंतर महिलेने गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर तिला दुसऱ्या व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये चार सदस्यांसह हलवण्यात आले. ज्यात ॲडमिन, आदित्य सक्सेना यांचा समावेश होता. ज्यांनी तिला जॅम्बीन नावाचे ॲप डाउनलोड करण्याचे निर्देश दिले. तिच्या व्हर्च्युअल खात्यात 10,000 रुपय जमा केल्यानंतर आणि थोडा नफा पाहून सक्सेनाने तिला अधिक गुंतवणूक करण्यास प्रोत्साहित केले. विशेषतः ब्लॅक ट्रेंड नावाच्या कंपनीत गुंतवणूक करण्यास तिला सांगण्यात आले. ज्यामुळे सायबर फसवणूक होण्यास सुरुवात झाली. (हेही वाचा, Pune Cyber Fraud Cases: पुण्यात सायबर फसवणुकीच्या घटनांमध्ये वाढ; या वर्षी जानेवारी-जुलै दरम्यान समोर आली 850 प्रकरणे, 198.45 कोटींचे नुकसान)

फसवणूक होताच पोलीसाची आठवण

अज्ञात व्यक्तींनी दाखवलेल्या नफ्याचे आमिष पाहून पीडित महिला आणि तिच्या पतीने एकूण 43.87 लाख रुपये एकूण 56 व्यवहारांमध्ये गुंतवले आणि सक्सेनाने दिलेल्या विविध बँक खात्यांमध्ये पैसे ट्रान्सफर केले. मात्र, 12 जून रोजी तिने पैसे काढण्याचा प्रयत्न केला असता, ती काढू शकली नाही. त्यानंतर सुनीताने तिला कळवले की तिला तिच्या नफ्यातील 30% रक्कम ट्रेडिंग खात्यात जमा करणे आवश्यक आहे. महिलेने सुनीता यांना तिच्या नफ्यातून रक्कम कापून घेण्यास सांगितले असता त्यांनी नकार दिला. त्यावरुन महिलेला आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. नंतर तिने पोलिसांकडे तत्काळ धाव घेतली. वरळी येथील सेंट्रल सायबर पोलीस ठाण्यात 2 ऑगस्ट रोजी गुन्हा दाखल करण्यात आला.