Financial Frauds: देशात गेल्या काही वर्षांत आर्थिक फसवणुकीच्या घटनांमध्ये (Financial Frauds) वाढ झाली आहे. अहवालानुसार, 47 टक्के भारतीयांनी गेल्या तीन वर्षांत एक किंवा अधिक आर्थिक फसवणुकीचा अनुभव घेतला आहे. शुक्रवारी प्रसिद्ध झालेल्या सर्वेक्षणात असे म्हटले आहे की, यापैकी युपीआय (UPI) आणि क्रेडिट कार्डशी (Credit Card) संबंधित आर्थिक फसवणूक सर्वात सामान्य आहे.
लोकल सर्कल्सने (LocalCircles) 302 जिल्ह्यांतील 23,000 लोकांमध्ये केलेल्या सर्वेक्षणात असे म्हटले आहे की, अर्ध्याहून अधिक लोकांना त्यांच्या क्रेडिट कार्डवर देशांतर्गत आणि/किंवा आंतरराष्ट्रीय व्यापारी/वेबसाइट्सद्वारे अनधिकृत शुल्काचा सामना करावा लागला आहे.
एजन्सीने एका निवेदनात म्हटले आहे की, हा अहवाल फसवणूक टाळण्यासाठी सुरक्षा उपाययोजना करण्याची आणि ग्राहक जागरूकता निर्माण करण्याची तातडीची गरज अधोरेखित करतो.
अहवालात समोर आले आहे की, 43 टक्के लोकांनी क्रेडिट कार्डवर फसवे व्यवहार झाल्याचे सांगितले, तर 36 टक्के लोकांनी युनिफाइड पेमेंट इंटरफेस व्यवहारांमध्ये फसवेगिरी झाल्याचे सांगितले. क्रेडिट कार्डच्या फसवणुकीबद्दल, 53 टक्के लोकांनी देशांतर्गत व्यापारी आणि वेबसाइट्सद्वारे लादलेल्या अनधिकृत शुल्कांबद्दल भाष्य केले. (हेही वाचा: No Charges For Multiple SIMs: एका फोनमध्ये 2 सिम कार्ड वापरण्यासाठी कोणतेही शुल्क भरावे लागणार नाही; TRAI ने फेटाळून लावल्या सर्व अफवा)
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या (RBI) आकडेवारीनुसार, 2023-24 या आर्थिक वर्षात फसवणुकीच्या प्रकरणांमध्ये 166 टक्क्यांनी वाढ होऊन, आकडा 36,000 पेक्षा जास्त झाला आहे. मात्र, त्यांचे मूल्य 2022-23 या आर्थिक वर्षाच्या तुलनेत जवळपास निम्मे (13,930 कोटी रुपये) आहे. गेल्या तीन वर्षांत गोळा केलेल्या डेटाचा हवाला देऊन, लोकलसर्कल्सने म्हटले आहे की, 10 पैकी 6 लोक भारतीय नियामकांना किंवा कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या एजन्सींना आर्थिक फसवणुकीची तक्रार करत नाहीत.