Inflation: जानेवारी 2014 पासून आतापर्यंत महागाई 70% वाढली; 20 वर्षात 23 रुपयांची थाळी 78 रुपयांवर पोहोचली
Image used for representational purpose | (Photo Credits: PTI)

सध्या दिवसेंदिवस वाढत असलेल्या महागाईचा (Inflation) परिणाम आता आपल्या रोजच्या थाळीवर दिसू लागला आहे. एका विश्लेषणानुसार, गेल्या 20 वर्षांत एका दिवसाच्या थाळीची किंमत 23 रुपयांवरून 78 रुपयांपर्यंत वाढली आहे. म्हणजेच यामध्ये 3 पटीने वाढ झाली आहे. हे विश्लेषण घाऊक किंमत निर्देशांकाच्या डेटावर आधारित आहे. एवढेच नाही तर खाद्यपदार्थांपासून तेलाच्या किमतीत वाढ झाल्याने महागाईने 8 वर्षांचा उच्चांक गाठला आहे. सरकारी आकडेवारीनुसार, ग्राहक किंमत निर्देशांक (CPI) आधारित किरकोळ महागाई एप्रिलमध्ये 7.79% पर्यंत वाढली आहे.

होलसेल एंड रिटेल प्राइज इंफॉर्मेशन सिस्टम (WPI) नुसार, मार्च 2012 च्या तुलनेत रोजच्या जीवनातील वस्तूंच्या किमती मार्च 2022 मध्ये म्हणजे 10 वर्षांमध्ये 68% वाढल्या आहेत. त्याच वेळी, ग्राहक अन्न किंमत निर्देशांक (CPI) नुसार, जानेवारी 2014 च्या तुलनेत मार्च 2022 मध्ये देशातील एका कुटुंबाद्वारे खाल्ल्या जाणाऱ्या अन्नपदार्थांच्या किमती 70% वाढल्या आहेत. जगभरातील अनेक अर्थव्यवस्था महागाई मोजण्यासाठी WPI ला त्यांचा आधार मानतात. मात्र, भारतात असे नाही, आपल्या देशात WPI सोबत CPI हे देखील महागाईचे मोजमाप मानले जाते. (हेही वाचा: एसबीआयने ग्राहकांना दिला मोठा झटका! कर्जदरात केली 0.1 टक्के वाढ; तुमच्या EMI वर होणार 'असा' परिणाम)

सरकारी आकडेवारीनुसार, मार्च 2021 च्या तुलनेत मार्च 2022 मध्ये खाद्यपदार्थांच्या किमती 7.68% जास्त होत्या. नोव्हेंबर 2020 नंतरचा हा उच्चांक आहे. जानेवारी 2014 ते मार्च 2022 हा कालावधी पाहिल्यास, दर महिन्याला खाद्यपदार्थांच्या किमतीत सरासरी 4.483% वाढ झाली आहे. म्हणजे जानेवारी 2014 मध्ये जो माल 100 रुपयांमध्ये मिळत होता तो आता 170 रुपये झाला आहे.

रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्यामुळे कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे. ऑक्टोबर 2019 पासून किरकोळ महागाई सातत्याने वाढत आहे. या कालावधीत फक्त एकदाच असे घडले आहे जेव्हा ती 4 टक्क्यांवर आली. याशिवाय, दर महिन्याला ती 4% पेक्षा जास्त परंतु जास्तीतजास्त सतत 6% वर राहिली आहे. 2022 च्या सुरुवातीपासून म्हणजे रशियाच्या युक्रेनवर हल्ला होण्यापूर्वीच भारतातील चलनवाढीचा दर 6% च्या वर आहे.