SBI Hikes Lending Rate: एसबीआयने ग्राहकांना दिला मोठा झटका! कर्जदरात केली 0.1 टक्के वाढ; तुमच्या EMI वर होणार 'असा' परिणाम
SBI | (Photo Credits: PTI)

SBI Hikes Lending Rate: देशातील सर्वात मोठी सरकारी बँक स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI) आपल्या ग्राहकांना मोठा धक्का दिला आहे. SBI ने त्याचा MCLR (मार्जिनल कॉस्ट ऑफ फंड बेस्ड लेंडिंग रेट) 10 बेस पॉइंट्स म्हणजे 0.1 टक्क्यांनी वाढवला आहे. कर्जदरातील ही वाढ सर्व कालावधीसाठी लागू आहे. बँकेच्या या निर्णयामुळे कर्जदारांना कर्ज घेणे महाग होणार असून त्यांना अधिक ईएमआय भरावा लागणार आहे. SBI ने महिनाभरात दुसऱ्यांदा MCLR वाढवला आहे. दोन्ही वाढ एकत्र करून, कर्जदरात आतापर्यंत 0.2 टक्क्यांनी वाढ झाली आहे.

SBI च्या वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार, नवीन MCLR दर 15 मे पासून लागू झाले आहेत. या दुरुस्तीनंतर एक वर्षाचा MCLR 7.10 टक्क्यांवरून 7.20 टक्के झाला आहे. बहुतेक कर्जे एका वर्षाच्या MCLR दराशी जोडलेली असतात. एक रात्र, एक महिना आणि तीन महिन्यांचा MCLR 6.85 टक्क्यांनी वाढला, तर सहा महिन्यांचा MCLR 7.15 टक्क्यांवर गेला. त्याच वेळी, दोन वर्षांचा MCLR 0.1 टक्क्यांनी वाढून 7.40 टक्के झाला आहे, तर तीन वर्षांचा MCLR 7.50 टक्क्यांवर गेला आहे. (हेही वाचा - आता कोणीही करू शकणार नाही तुमच्या Aadhaar Card चा गैरवापर! 'असे' करा तुमचे आधार कार्ड लॉक-अनलॉक)

आरबीआयने रेपो दरात केली वाढ -

रिझर्व्ह बँकेने या महिन्याच्या सुरुवातीला रेपो दर 0.40 टक्क्यांनी वाढवून 4.40 टक्क्यांवर नेला होता. त्यानंतर SBI ने कर्जदरात वाढ केली आहे. एसबीआयने कर्ज महाग केल्यानंतर, येत्या काही दिवसांत इतर बँकाही असेच करतील अशी अपेक्षा आहे. या वाढीमुळे MCLR वर कर्ज घेतलेल्या ग्राहकांचा EMI वाढणार आहे. तथापि, ज्यांची कर्जे इतर बेंचमार्कशी जोडलेली आहेत, त्यांच्या EMI वर कोणताही परिणाम होणार नाही.

SBI चा बाह्य बेंचमार्क आधारित कर्ज दर (EBLR) 6.65 टक्के आहे. तर 1 एप्रिलपासून लागू होणारा रेपो-लिंक्ड लेंडिंग रेट (RLLR) 6.25 टक्के आहे. घर आणि वाहनासह कोणत्याही प्रकारचे कर्ज देताना बँका EBLR आणि RLLR मध्ये क्रेडिट रिस्क प्रीमियम (CRP) जोडतात.