
भारतातील बहुतेक राज्यांमध्ये, लोक गाडी चालवताना इतके अनावश्यक हॉर्न (Vehicle Horns) वाजवतात की त्यामुळे ध्वनी प्रदूषण वाढते. या हॉर्नच्या कर्कश्श आवाजामुळे अनेकांना त्रास होतो. अशात केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितिन गडकरी (Minister Nitin Gadkari) यांनी एक नाविन्यपूर्ण प्रस्ताव मांडला आहे, ज्यामुळे वाहनांच्या हॉर्नच्या कर्कश आवाजाला बासुरी, तबला, व्हायोलिन आणि हार्मोनियमसारख्या भारतीय संगीत वाद्यांच्या (Indian Musical Instruments) मधुर ध्वनींनी बदलण्याचा कायदा आणला जाईल. नवभारत टाइम्सच्या 78व्या स्थापना दिन समारंभात बोलताना, गडकरी यांनी ध्वनि प्रदूषण कमी करण्याच्या आणि रस्त्यावरील अनुभव सुखद करण्याच्या उद्देशाने हा प्रस्ताव सादर केला.
गडकरी यांनी यापूर्वी 2021 मध्ये नाशिक येथील एका महामार्ग उद्घाटन समारोहात ही कल्पना मांडली होती, जिथे त्यांनी एम्बुलेंस आणि पोलिसांच्या सायरनला ऑल इंडिया रेडियोच्या सिग्नेचर ट्यूनसारख्या मधुर ध्वनींनी बदलण्याचे सुचवले होते. त्यांचा विश्वास आहे की, यामुळे हॉर्न ऐकणे आनंददायी होईल. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी या नवीन योजनेबद्दल बोलताना सांगितले की, ते एक कायदा करण्याचा विचार करत आहेत, जो वाहनांच्या हॉर्नमध्ये भारतीय वाद्यांचा आवाज वापरण्यास परवानगी देईल. (हेही वाचा: Tamil Nadu Accident: डिझेल टँकर, एलपीजी टँकर आणि महामंडळाच्या बसचा भीषण अपघात; 20 हून अधिक जण जखमी)
नितिन गडकरी यांनी सांगितले की, सध्याचे वाहन हॉर्न्स, जे 93 ते 112 डेसिबलपर्यंत आवाज निर्माण करतात, आणि सायरन, जे 120 डेसिबलपर्यंत पोहोचतात, यामुळे कानांचे नुकसान, तणाव आणि चिंता निर्माण होते. दीर्घकाळ अशा आवाजांच्या संपर्कात राहिल्याने उच्च रक्तचाप, हृदयविकार आणि डिमेंशियासारख्या आजारांचा धोका वाढतो. या समस्येवर उपाय म्हणून, त्यांनी वाहनांच्या हॉर्नसाठी भारतीय संगीत वाद्यांच्या ध्वनींचा वापर अनिवार्य करणारा कायदा आणण्याची योजना जाहीर केली.
भारतीय संगीत वाद्यांचा वापर केल्याने देशाच्या सांस्कृतिक वारशाला प्रोत्साहन मिळेल आणि कमी तीव्रतेच्या आणि सुखद ध्वनीमुळे कानांचे नुकसान, तणाव आणि हृदयविकारांचा धोका कमी होईल, ज्यामुळे सार्वजनिक आरोग्याला फायदा होईल. देशातील रस्ते आणि वाहतूक व्यवस्था सुधारण्यासाठी केंद्र सरकार सतत काम करत आहे. भारतातील प्रदूषण कमी करणे आणि लोकांना आरामदायी प्रवासाचा अनुभव देणे हे त्यांचे उद्दिष्ट आहे. वायू प्रदूषणाबाबत चिंता व्यक्त करताना नितीन गडकरी म्हणाले की, देशातील 40 टक्के वायू प्रदूषण वाहतूक क्षेत्रामुळे होते, म्हणूनच सरकार मिथेनॉल आणि इथेनॉल सारख्या हिरव्या इंधनावर चालणाऱ्या वाहनांना प्रोत्साहन देत आहे, यामुळे प्रदूषण कमी होण्यास मदत होईल.