Layoff | Representational Image (Photo Credits: Pixabay)

Downsizing In Many Companies: जगभरातील असंख्य कॉर्पोरेट कंपन्यांनी एकापाठोपाठ एक असा कर्मचारी कपातीचा दणका लावला आहे. यात गुगल( Google), मायक्रोसॉफ्ट (Microsoft), Amazon, फेसबुक (Facebook) सह अनेक कंपन्या आघाडीवर आहेत. कंपन्यांच्या या धोरणाचा फटका विदेशात राहणाऱ्या हजारो भारतीय तरुणांना बसतो आहे. जे या कंपन्यांमध्ये बड्या पॅकेजवर काम करत आहेत. यात प्रामुख्याने आयटीत ( IT professionals) काम करणाऱ्या तरुणांची संख्या अधिक आे. कर्मचारी कपातीमुळे या तरुणांवर नोकरी गमावण्याची वेळ आली आहे. परिणामी बेकारीही वाढू लागली आहे. त्यामुळे आहेत त्या नोकऱ्या टीकविण्यासाठी या तरुणांना शर्थिचे प्रयत्न करावे लागत आहेत. अनेक तरुण त्या देशांमध्ये राहण्यासाठी वर्क व्हिसाच्या समाप्तीनंतर निर्धारित कालावधीत नवीन रोजगार शोधण्यासाठी धडपडत आहेत. देशात राहण्यासाठी रोजगार.

जगभरात कंपन्यांकडून होत असलेल्या टाळेबंदीबाबत द वॉशिंग्टन पोस्ट ने वृत्त दिले आहे. या वृत्तानुसार गेल्या नोव्हेंबर 2022 पासून जवळपास 200,000 आयटी कामगारांना कामावरून काढून टाकण्यात आले आहे. ज्यात गुगल, मायक्रोसॉफ्ट, फेसबुक आणि अॅमेझॉन सारख्या कंपन्यांतील कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. ज्यांची संख्या विक्रमी आहे. धक्कादायक म्हणजे यात 30 ते 40 टक्के भारतीय आयटी व्यावसायिक आहेत. तसेच, यातील बहुतांश लोक H-1B आणि L1 व्हिसावर आहे. (हेही वाचा, Microsoft Layoffs 2023: मायक्रोसॉफ्ट कर्मचाऱ्यांवर संक्रांत; आजपासून शेकडो लोकांच्या नोकऱ्या जाण्याची शक्यता- रिपोर्ट)

H-1B व्हिसा म्हणजे काय?

यूएसमधील कंपन्यांना सैद्धांतिक किंवा तांत्रिक कौशल्याची आवश्यकता असलेल्या विशेष व्यवसायांमध्ये विदेशी कामगारांना कामावर ठेवण्यासाठी एक विशिष्ट प्रकारचा व्हिसा दिला जातो. त्याला H-1B व्हिसा म्हणतात. जो नॉन-इमिग्रंट व्हिसा मानला जातो. भारत आणि चीन सारख्या देशांमधून दरवर्षी हजारो कर्मचारी नियुक्त करण्यासाठी तंत्रज्ञान कंपन्या या व्हिसावर अवलंबून असतात.

L-1A आणि L-1B व्हिसा

L-1A आणि L-1B व्हिसा तात्पुरत्या इंट्राकंपनी बदल्यांसाठी मिळतो. खास करुन जे कर्मचारी व्यवस्थापकीय पदांवर काम करतात किंवा त्यांना विशेष ज्ञान आहे. भारतातील अनेक आयटी व्यवसायिक विदेशामध्ये (यूएस) H-1B L1 सारख्या बिगर स्थलांतरित वर्क व्हिसावर राहतात. त्यामुळे त्यांना पुढेही यूएसमध्ये राहायचे असेल आणि त्यांनी नोकरी गमावली असेल तर त्यांना पुढच्या अवघ्या काहीच दिवसात नवी नोकरी स्वीकारावी लागणार आहे. H-1B व्हिसावर असलेल्यांसाठी परिस्थिती आणखीनच बिकट होत चालली आहे कारण त्यांना 60 दिवसांच्या आत नवीन नोकरी शोधावी लागेल अन्यथा, त्यांच्याकडे भारतात परत जाण्याशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही.