Microsoft Layoffs 2023: मायक्रोसॉफ्ट कर्मचाऱ्यांवर संक्रांत; आजपासून शेकडो लोकांच्या नोकऱ्या जाण्याची शक्यता- रिपोर्ट
Microsoft. (Photo Credits: Twitter)

ट्विटर (Twitter), मेटा (Meta) यांसारख्या दिग्गज समजल्या जाणाऱ्या टेक कंपन्यांनी काही महिन्यांपासूनच कर्मचारी कपात सुरु केली आहे. याच पावलावर पाऊल टाकत आता आणखी एक दिग्गज कंपनी मायक्रोसॉफ्ट (Microsoft) हिसुद्धा संभाव्य आर्थिक मंदीचा (Economic Recession) धोका विचारात घऊन अनिश्चित काळासाठी कर्मचारी कपात (Microsoft Layoffs 2023) करणार असल्याचे वृत्त आहे. जगभरातील आंतरराष्ट्रीय प्रसारमाध्यांनी दिलेल्या वृत्तानुसार मायक्रोसॉफ्ट जवळपास 5% कर्मचाऱ्यांना कामावरुन काढून टाकू शकते. मायक्रोसॉफ्टकडून आजच (18 जानेवारी) कर्मचारी कपातीची घोषणा केली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

ब्लूमबर्गने दिलेल्या एका वृत्तात दावा करण्यात आला आहे की, टेक जायंट (मायक्रोसॉफ्ट) लवकरच कर्मचारी कपात घोषणा करू शकते. सध्या, मायक्रोसॉफ्टमध्ये 220,000 पेक्षा जास्त कर्मचारी कार्यरत आहेत. त्यातील 5 टक्के म्हणजे अंदाजे 11,000 कर्मचारी कमी केले जाण्याची शक्यता आहे. पाठिमागील वर्षी ऑक्टोबरमध्ये मायक्रोसॉफ्टने आपल्या जवळपास 1000 कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले होते. (हेही वाचा, Microsoft Layoffs: मायक्रोसॉफ्टने 1,000 हून अधिक कर्मचार्‍यांना काढून टाकले; जुलै 2022 पासून 1% लोकांना कमी केले)

दावा केला जात आहे की, मायक्रोसॉफ्ट कंपनीतील कर्मचारी कपातीचा सर्वाधिक फटका हा अभियांत्रिकी म्हणजेच इंजिनिअरींग विभागाला बसेल. मायक्रोसॉफ्टने नुकतेच अमेरिकेतील कर्मचाऱ्यांसाठी नुकतेच अमर्यादित वेळ बंद धोरण (unlimited time off policy) अवलंबले आहे. त्यानंतर काही दिवसांमध्येच एक धोरणात्मक निर्णय म्हणून पगारदार कर्मचाऱ्यांना सुट्ट्यांचे दिवस निश्चित नसतील. ते अमर्यादित काळासाठी सुट्ट्या घेऊ शकतात. हे धोरण मात्र अर्धवेळ कामगारांना लागू असणार नाही.

दरम्यान, मेटा कंपनीने ने नोव्हेंबरमध्ये 11,000 नोकर्‍या किंवा सुमारे 13% कर्मचारी कपात केल्याची घोषणा केली. ऑगस्टच्या शेवटी, स्नॅपचॅटने सुमारे 20% कर्मचारी म्हणजेच सुमारे 1,200 कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन कमी केले. एक मोठा आयटी समूह असलेल्या सेल्सफोर्सने जानेवारी (2023) च्या सुरुवातीसच जाहीर केले होते की, त्यांनी 10% कर्मचारी म्हणजेच सुमारे 8000 लोकांना कामावरुन कमी केले. यासोबतच ट्विटर हे अब्जाधीश एलोन मस्क यांनी ऑक्टोबरमध्ये विकत घेतले होते, ज्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मच्या 7,500 कर्मचाऱ्यांपैकी निम्म्या कर्मचाऱ्यांना तातडीने काढून टाकले होते.