Global Population | प्रातिनिधिक प्रतिमा | Photi credit : Pixabay

मंगळवारी (15 नोव्हेंबर) जगाची लोकसंख्या (World Population) विक्रमी पातळीवर पोहोचली. जगाची लोकसंख्या आठ अब्जांच्या पुढे गेली आहे. 2030 पर्यंत पृथ्वीवरील लोकसंख्येचा हा आकडा 850 कोटी, 2050 मध्ये 970 कोटी आणि 2100 पर्यंत 1040 कोटीपर्यंत वाढण्याचा अंदाज आहे. हा महत्त्वाचा टप्पा गाठण्यात भारताचा मोठा वाटा आहे. या कालावधीत भारताने जागतिक लोकसंख्येमध्ये सर्वाधिक 17.70 कोटी लोकांची भर घातली. भारत पुढील वर्षी जगातील सर्वाधिक लोकसंख्येचा देश म्हणून चीनला मागे टाकण्याच्या मार्गावर आहे.

पॉप्युलेशन प्रॉस्पेक्ट्स अहवालात असे म्हटले आहे की 2022 मध्ये भारताची लोकसंख्या चीनच्या 1.426 अब्जांच्या तुलनेत 1.412 अब्ज आहे. 2050 मध्ये भारताची लोकसंख्या 1.668 अब्ज होईल असा अंदाज आहे. UNFPA च्या अंदाजानुसार, 2022 मध्ये भारतातील 68 टक्के लोकसंख्या 15-64 वयोगटातील आहे, तर 65 आणि त्याहून अधिक वयोगटातील लोक लोकसंख्येच्या सात टक्के होते. युनायटेड नेशन्स (UN) ने म्हटले आहे की जागतिक आकडेवारी सार्वजनिक आरोग्यामध्ये मोठी सुधारणा दर्शवते, ज्यामुळे मृत्यूचा धोका कमी झाला आहे आणि आयुर्मान वाढले आहे.

युनायटेड नेशन्सच्या अहवालात मानवाच्या सरासरी वयाबद्दल दावा करण्यात आला आहे की, सध्या ते 72.8 वर्षे आहे, जे 1990 च्या तुलनेत 2019 पर्यंत नऊ वर्षांनी वाढले आहे. अहवालात 2050 पर्यंत माणसाचे सरासरी वय 77.2 वर्षांपर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे. या अहवालात असे म्हटले आहे की, महिला पुरुषांपेक्षा सरासरी 5.4 वर्षे जास्त जगतात. महिलांचे सरासरी वय 73.4 वर्षे आणि पुरुषांचे सरासरी वय 68.4 वर्षे आहे.

युनायटेड नेशन्सने प्रसिद्ध केलेल्या या वार्षिक जागतिक लोकसंख्येच्या संभाव्य अहवालात असेही म्हटले आहे की, जागतिक लोकसंख्या 1950 नंतर सर्वात कमी वेगाने वाढत आहे, जी 2020 मध्ये एक टक्क्यांहून कमी झाली आहे. अहवालानुसार, जागतिक लोकसंख्या 7 ते 8 अब्जांपर्यंत वाढण्यास 12 वर्षे लागली आहेत, तर 2037 पर्यंत ती 9 अब्जांपर्यंत पोहोचेल.

वार्षिक जागतिक लोकसंख्या संभावना अहवालात दावा करण्यात आला आहे की, पुढील 27 वर्षांत जगातील निम्मी लोकसंख्या 8 देशांमध्ये राहणार आहे. म्हणजे जगातील इतर देशांच्या तुलनेत या आठ देशांतील लोकसंख्या सर्वाधिक असेल. 2050 पर्यंत भारत, पाकिस्तान, काँगो, इजिप्त, इथिओपिया, नायजेरिया, फिलीपिन्स आणि टांझानिया या देशांमध्ये जगातील 50 टक्के लोकसंख्या राहिल, असे अहवालात नमूद करण्यात आले आहे. याचा अर्थ पुढील काही वर्षांत या आठ देशांची लोकसंख्येची घनता सर्वाधिक असणार आहे. (हेही वाचा: Eight Billionth Baby: मनिला येथील टोंडोमध्ये जन्मले प्रतिकात्मक 'आठ अब्जावे बाळ')

अहवालात असा दावा करण्यात आला आहे की, 2010 ते 2021 दरम्यान पाकिस्तानमधील जास्तीत जास्त नागरिकांनी देश सोडून इतर देशांमध्ये आपले तळ ठोकले. अहवालानुसार, 2010 ते 2021 दरम्यान सुमारे 1.65 कोटी पाकिस्तानींनी आपला देश सोडला आणि इतर देशांचे नागरिकत्व घेतले. या यादीत भारताचा दुसरा क्रमांक आहे, जिथे 35 लाख लोक देश सोडून इतर देशांमध्ये स्थायिक झाले आहेत. यानंतर बांगलादेशातील 29 लाख, नेपाळमधील 16 लाख आणि श्रीलंकेतील 10 लाख नागरिकांनी देश सोडून दुसऱ्या देशाचे नागरिकत्व घेतले आहे.