Delhi Driver Survey: दिल्लीच्या (Delhi) रस्त्यांवर चालताना लोकांनी अत्यंत सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. विशेषत: पादचारी, सायकलस्वार आणि दुचाकीस्वारांनी. अन्यथा हे लोक कधीही अपघाताचे बळी ठरू शकता. याचे मुख्य कारण म्हणजे दिल्लीतील रस्त्यांवर 80 टक्क्यांहून अधिक लोक दारूच्या नशेत वाहन चालवत आहेत. असे वाहनचालक केवळ स्वतःच्याच जीवाशी खेळत नाहीत, तर रस्त्यावरील इतर नागरिकांचा जीवही धोक्यात घालत आहेत.
रस्ते सुरक्षेवर विशेषत: दारू पिऊन गाडी चालवण्याविरोधात काम करणाऱ्या CADD या एनजीओने दिल्लीतील विविध श्रेणीतील सुमारे 30 हजार लोकांशी बोलून एक सर्वेक्षण केले. यामध्ये अनेक गंभीर बाबी समोर आल्या आहेत. सर्वेक्षणात दावा करण्यात आला आहे की, दिल्लीत गाडी चालवणाऱ्या 81.2 टक्के लोकांनी हे मान्य केले आहे की त्यांनी कोणत्या ना कोणत्या नशेत गाडी चालवली आहे. हे सर्वेक्षण जर खरे असेल तर, दिल्लीत वाहन चालवणारे बहुतेक लोक दारू पिऊन वाहन चालवतात, जे केवळ स्वत:साठीच नाही तर इतरांच्या जीवासाठीही धोकादायक आहे.
त्याचप्रमाणे ते वाहन चालवताना वेगाकडे लक्ष देतात का, अशी विचारणा सर्वेक्षणात करण्यात आली होती. यातही धक्कादायक निकाल समोर आले आहेत. सर्वेक्षणात 74 टक्के चालकांनी सांगितले की, ते वाहन चालवताना स्पीडोमीटरकडे लक्ष देत नाहीत. आता अशा परिस्थितीत त्यांचा वेग निर्धारित मर्यादेपेक्षा जास्त आहे की नाही, हे त्यांनाही कळत नाही. त्याचप्रमाणे, 80 टक्क्यांहून अधिक चालकांनी सांगितले की त्यांनी वैध ड्रायव्हिंग चाचणी न देता परवाना मिळवला आहे. अशा परिस्थितीत एवढ्या मोठ्या संख्येने लोकांनी दलालामार्फत किंवा अन्य काही गैरप्रकार करून परवाने मिळवले का?, असा मोठा प्रश्न उपस्थित होत आहे. (हेही वाचा: Farmers Protest: शेतकरी आंदोलनादरम्यान पंजाबधील काही भागात 24 फेब्रुवारी पर्यंत इंटरनेट सेवा बंद)
सुमारे 70 टक्के लोकांनी सांगितले की, त्यांनी कोणत्याही नोंदणीकृत ड्रायव्हिंग स्कूलमधून ड्रायव्हिंग शिकले नाही. यामध्ये बहुतांश पुरुष चालक होते. तसेच 83 टक्क्यांहून अधिक लोकांनी रस्ता ओलांडताना झेब्रा क्रॉसिंग आणि एफओबी दिसत नसल्याचे सांगितले. 39 टक्के हेल्मेट घालत नाहीत. 96 टक्क्यांहून अधिक लोकांनी सांगितले की त्यांना ब्लॅक स्पॉट्सबद्दल काहीच माहिती नाही. एनजीओने सांगितले की, सर्वेक्षणात कार, दुचाकी, ऑटो, सायकल, कॅब, बस, ट्रक, विक्रम, मिनी व्हॅन, रिक्षा आणि इतर सर्व प्रकारच्या व्यावसायिक वाहने चालविणाऱ्या 30 हजार चालकांचे 1 ऑगस्ट ते 31 डिसेंबर दरम्यान सर्वेक्षण करण्यात आले.