'चलो दिल्ली' ('Delhi Chalo' Protest) हे शेतकरी आंदोलन (Farmers Protest) अद्यापही सुरुच आहे. शेतकरी आणि केंद्र सरकार यांच्यात विविध मागण्यांवर सुरु असलेल्या चर्चेदरम्यान अद्याप कोणताही तोडगा निघाला नाही. परिणामी हरियाणा, पंजाब, उत्तर प्रदेश आदी राज्यांमध्ये शेतकऱ्यांमध्ये प्रचंड रोष पाहायला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पंजाब राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये केंद्रीय गृहमंत्रालयाने इंटरनेट सेवा (Internet Services Suspend) निलंबनाचा कालावधी वाढवला आहे. प्राप्त माहितीनुसार, पतियाळा, संगरूर आणि फतेहगढ साहिबसह पंजाब जिल्ह्यांतील काही भागात इंटरनेट सेवा निलंबीत करण्यात आली आहे. ही सेवा येत्या 24 फेब्रुवारीपर्यंत स्थगित असेल. शेतकऱ्यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या 'दिल्ली चलो' मोर्चाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. ज्यामुळे सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
इंटरनेट बंदीमुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी
'दिल्ली चलो' शेतकरी आंदोलन सुरु असल्याुळे 12 ते 16 फेब्रुवारी दरम्यान सुरुवातीच्या काळात इंटरनेट सेवा निलंबीत करण्यात आली होती. मात्र, शेतकरी आंदोलनाची धार पाहून त्याचा कालावधी वाढविण्यात आला आहे. त्यामुळे चोवीस फेब्रुवारीपर्यंत पंजबामधील अनेक ठिकाणी इंटरनेट सेवा बंद राहणार आहे. मंत्रालयाच्या 16 फेब्रुवारीच्या निर्देशानुसार, मोहाली, भटिंडा, मुक्तसर, मानसा आणि इतर प्रदेशांमधील निवडक क्षेत्रांसह, पतियाळा, संगरूर आणि फतेहगढ साहिब जिल्ह्यांतील विविध पोलिस स्टेशन कार्यक्षेत्रात इंटरनेट सेवा निलंबित राहतील.
पंजाब सरकारही नाराज
पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी 15 फेब्रुवारी रोजी चंदीगडमध्ये तीन केंद्रीय मंत्री आणि शेतकरी प्रतिनिधींसोबत झालेल्या बैठकीत इंटरनेट बंदीबद्दल नाराजी व्यक्त केली. मात्र, राज्य सरकारने चिंता व्यक्त करूनही परिस्थिती कायम आहे. (हेही वाचा, Farmers Protest: शेतकरी आंदोलन दुसऱ्या दिवशीही सुरुच; दिल्ली पोलिसांकडून प्रतिबंधात्मक आदेश, सीमेवर प्रचंड वाहतूक कोंडी)
दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांचे आंदोलन
दरम्यान, हरियाणा सरकारने सध्या सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान अंबाला, कुरुक्षेत्र आणि सिरसा यासह अनेक जिल्ह्यांमध्ये मोबाइल इंटरनेट सेवा आणि बल्क एसएमएसवर निर्बंध लादले आहेत. संयुक्त किसान मोर्चा आणि किसान मजदूर मोर्चाच्या नेतृत्वाखालील 'दिल्ली चलो' आंदोलनाचा उद्देश पिकांसाठी किमान आधारभूत किंमत आणि कर्जमाफी यासह विविध मागण्यांसाठी केंद्रावर दबाव आणणे आहे. पंजाबमधील शेतकऱ्यांनी या आठवड्याच्या सुरुवातीला दिल्लीच्या दिशेने मोर्चा काढला परंतु पंजाब-हरियाणा सीमेवर बॅरिकेड्स आणि कडक सुरक्षा तौनात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा मार्ग अडवला गेला आहे. परिणामी हे शेतकरी आपल्या मागण्यांच्या निकालाच्या प्रतीक्षेत सीमावर्ती ठिकाणी निदर्शने करत आहेत.