भारतामध्ये सध्या दिवाळी (Diwali 2020) उत्सवाला सुरुवात झाली आहे. दीपावलीच्या पाच दिवसांमध्ये लक्ष्मीपूजनाला फार महत्व आहे. सध्या लक्ष्मीपूजेची तयारीही सुरू झाली आहे. दिवाळीच्या काळात, पारंपारिक मान्यतानुसार लक्ष्मीचे वाहन असणाऱ्या घुबडाची (Owl sacrifice is done during Diwali (Photo credits: Pixabay)) मागणी अचानक वाढते. दिवाळीत तांत्रिकांद्वारे अवैधरित्या घुबडांची शिकार करण्याचा धोका असतो, म्हणूनच देशातील वन विभाग सतर्क झाले आहे. दिवाळी उत्सवापूर्वी उत्तराखंड वनविभागाने रेड अलर्ट जारी करत, कार्बेट टायगर रिझर्व्हने (CTR) सर्व फील्ड कर्मचार्यांच्या सुट्या रद्द केल्या आहेत. घुबडांच्या संरक्षणासंदर्भात वनविभागाने ही पावले उचलली आहेत.
टाईगर रिझर्व्हद्वारे 15 नोव्हेंबरपर्यंत सर्व फील्ड स्टाफच्या सुट्ट्या रद्द करण्यात आल्या आहेत. तसेच, राखीव पेट्रोलिंग, विशेषत: रात्रीच्या वेळी वाढविण्यात आले आहे. हिंदू मान्यतेनुसार घुबड हे सुख आणि समृद्धीची देवी लक्ष्मीचे वाहन आहे आणि काही तांत्रिक पूजेवेळी लक्ष्मी मातेला संतुष्ट करण्यासाठी घुबडाचा बळी देतात. तसेच काही लोक हाड, पिसे, रक्त, मांस इ. साठी घुबडांची शिकार करतात. या पार्श्वभूमीवर सर्व कर्मचार्यांना निर्देश देण्यात आले आहेत की, अशा तक्रारी ज्या ठिकाणी येतील तेथे वन अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करावा. कॉर्बेट व्याघ्र प्रकल्पाचे संचालक राहुल यांनी याबाबत माहिती दिली.
असे मानले जाते की लक्ष्मी घुबडावर विराजमान होऊन भ्रमण करते. म्हणूनच पूजेवेळी घुबडाचा बळी देऊन माता लक्ष्मी कोठेही येण्याजाण्यास असमर्थ ठरते आणि आपल्या घरातच कायमचे वास्त्यव्य करते, अशी मान्यता आहे. दिवाळीत तंत्र मंत्रामध्ये घुबडांचा वापर केला जातो. पूजेनंतर, यज्ञ केले जातात आणि घुबडांचा बळी दिला जातो. त्यानंतर त्याच्या शरीराचे वेगवेगळे भाग वेगवेगळ्या ठिकाणी ठेवले जातात जेणेकरून सर्व बाजूंनी समृद्धी येईल. (हेही वाचा: लक्ष्मी पूजनाच्या दिवशी दारासमोर काढा लक्ष्मीची सुंदर आणि आकर्षक पावलांची रांगोळी)
दरम्यान, भारतीय वन्यजीव अधिनियम 1972 च्या अनुसूची 1 अंतर्गत घुबड संरक्षित पक्षांच्या अंतर्गत येते. संरक्षित पक्ष्यांच्या यादीमध्ये घुबडांचा प्रथम श्रेणीत समावेश आहे, पूर्वी तो चौथ्या प्रकारात होता. इंटरनॅशनल युनियन फॉर कॉन्झर्व्हेशन ऑफ नेचरमध्ये घुबडांना एक लुप्तप्राय प्रजाती म्हणून समाविष्ट केले आहे. घुबडांची शिकार आणि विक्रीसाठी तीन वर्ष किंवा त्यापेक्षा अधिक शिक्षेची तरतूद आहे. दिवाळीच्या वेळी, घुबडाची किंमत 10 हजार ते लाखांच्या घरात असते, घुबड्याचे वजन, आकार, रंग आणि पंखांचा आकार यावरून त्याची किंमत निश्चित केली जाते.