Image used for representational purpose | (Photo Credits: PTI)

2020 मध्ये भारतात 50,035 सायबर गुन्हे (Cyber Crimes) नोंदवले गेले, जे मागील वर्षाच्या तुलनेत 11.8% जास्त आहेत. तसेच ‘सोशल मीडियावरील बनावट माहिती’ ची 578 प्रकरणे नोंदवली गेली. बुधवारी अधिकृत आकडेवारीवरून ही माहिती मिळाली. नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो (NCRB) च्या आकडेवारीनुसार, देशात सायबर गुन्हेगारीचे प्रमाण (प्रति एक लाख लोकसंख्येच्या घटना) 2019 मध्ये 3.3 टक्क्यांवरून 2020 मध्ये 3.7 टक्क्यांपर्यंत वाढले. 2013 ते 2020 दरम्यान या घटनांमध्ये जवळपास नऊपट वाढ झाली आहे. 2018 आणि 2020 दरम्यान, प्रकरणांमध्ये सुमारे 85 टक्के वाढ झाली आहे.

2020 मध्ये नोंदवलेल्या सायबर गुन्ह्यांपैकी 60 टक्के (30,142 प्रकरणे) फसवणूक, सुमारे सात टक्के लैंगिक अत्याचाराशी संबंधित आणि सुमारे पाच टक्के खंडणीची होती. सिक्कीम हे एकमेव राज्य आहे जिथे गेल्या वर्षी सायबर क्राईमचा एकही गुन्हा नोंदवला गेला नव्हता.

2020 मध्ये उत्तर प्रदेशात सर्वाधिक 11,097 सायबर गुन्हे नोंदवले गेले. यानंतर कर्नाटकात 10,741 प्रकरणे नोंदवण्यात आली. आकडेवारी दर्शवते की त्यानंतर महाराष्ट्र (5,496 प्रकरणे) आणि तेलंगणा (5,024 प्रकरणे) चा क्रमांत लागतो. 2019 आणि 2020 दरम्यान सायबर क्राइमच्या प्रकरणांमध्ये मोठी वाढ झालेल्या राज्यांमध्ये, अरुणाचल प्रदेश (7 ते 30), आसाम (2,231 ते 3,530), छत्तीसगड (175 ते 297), गोवा (15 ते 40), गुजरात (784 ते 1,283), मणिपूर (4 ते 79) आणि तेलंगणा (2,691 ते 5,024) यांचा नंबर लागतो. (हेही वाचा: IT Jobs: तब्बल 400 टक्क्यांनी वाढल्या भारतामधील 'या' आयटी व्यावसायिकांसाठी नोकरीच्या संधी; बंगळुरूमध्ये सर्वाधिक मागणी)

बिहार आणि तेलंगणामध्ये सायबर क्राइमच्या प्रकरणांमध्ये चार पटींनी वाढ झाली आहे, तर उत्तर प्रदेशात 2018 पासून 75 टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. ओडिशा, पश्चिम बंगाल, कर्नाटक आणि छत्तीसगडमध्ये 2018 पासून प्रकरणे दुप्पट झाली आहेत, तर तामिळनाडू आणि मणिपूरमध्ये तिप्पट वाढ झाली आहे. अहवालानुसार, मुंबईत 2 हजार 433 प्रकरणे नोंदवण्यात आली आहेत. चेन्नईमध्ये 186 आणि कोलकातामध्ये 172 सायबर गुन्ह्यांची नोंद झाली आहे.