जर तुम्ही आयटी (IT) क्षेत्रात नोकरी शोधत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. देशभरातील कंपन्या तंत्रज्ञान परिवर्तनांना प्राधान्य देत आहेत. अशा परिस्थितीत, आयटी व्यावसायिकांसाठी नोकरीच्या संधी सुमारे 400 टक्क्यांनी वाढल्या आहेत. एका अहवालानुसार, बीएफएसआय (BFSI) इंडस्ट्रीमधील मोठ्या मागणीमुळे, आयटीमधील कुशल व्यावसायिकांच्या मागणीतही जोरदार वाढ झाली आहे. बिझनेस सोल्युशन्स प्रोव्हायडर क्वेसच्या आकडेवारीनुसार, क्लाउड इन्फ्रास्ट्रक्चर टेक डेव्हलपर, फुल स्टॅक डेव्हलपर, रिएक्ट जेएस डेव्हलपर, अँड्रॉइड डेव्हलपर आणि अँगुलर जेएस डेव्हलपर असे विशिष्ट आयटी कौशल्य असलेल्या व्यावसायिकांची मागणी गेल्या तिमाहीपासून वाढली आहे.
लिस्टेड कौशल्यांव्यतिरिक्त, Gaming (Unity Developers), DevOps (Bamboo, Jira) आणि Platforms (Salesforce, SAP HANA) मध्येही कौशल्यांच्या मागणीत वाढ दिसून आली आहे. आयटी क्षेत्रात भरतीमध्ये वाढ होण्याचे प्रमुख कारण म्हणजे याआधी मोठ्या प्रमाणात दिले गेलेले राजीनामे. यामुळे आयटीमधील कुशल कामगारांच्या संख्येत मोठी घट झाली व आता कुशल कामगारांची मागणी वाढली आहे. यामुळे जून 2021 मधील भरती उपक्रम हा कोरोनापूर्व स्तरापेक्षा 52 टक्के अधिक होता. या काळात भरतीमध्ये 163 टक्के वाढ झाली.
यातही, बंगळुरू, हैदराबाद आणि पुणे सारख्या आयटी हब शहरांमध्ये जास्तीत जास्त भरती झाली आहे. यानंतर चेन्नई, मुंबई, एनसीआर आणि इतर मोठ्या शहरांची नावे आहेत. बंगळुरूमध्ये सर्वाधिक 40 टक्के, त्यानंतर हैदराबाद 18 टक्के आणि पुण्यात 18 टक्के भरती झाली. जर आपण कौशल्यांवर आधारित डेटा पाहिला तर बेंगलोरमध्ये, क्लाउड टेक डेव्हलपर्सची मागणी 41 टक्क्यांनी वाढली आहे, जेस डेव्हलपर्सची 44 टक्क्यांनी वाढ झाली आहे आणि अँड्रॉइड डेव्हलपर्सची मागणी सर्वाधिक 81 टक्के आहे. (हेही वाचा: नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओपन स्कूलिंगमध्ये नोकरीची सुवर्णसंधी, 115 रिक्त जागांसाठी भरतीप्रक्रिया सुरू)
दरम्यान, सोशल कॉमर्स कंपनी डीलशेअरने आपल्या कामकाजाला गती देण्यासाठी 10 कोटी डॉलर्स (736.3 कोटी रुपये) गुंतवणूकीची घोषणा केली आहे. यासह, ते सुमारे 5,000 रोजगार देखील प्रदान करतील.