COVID-19 Vaccine: भारतामध्ये Covishield, COVAXIN ला Emergency Use साठी DCGI ची मंजुरी
COVID-19 vaccine | Representational Image (Photo Credits: IANS)

भारतामध्ये आज (3 जानेवारी) डीसीजीआय (DCGI) कडून पत्रकार परिषद घेत कोविड 19 लसीला मंजुरी देण्यात आली आहे. यामध्ये डीसीजीआयने कोविशिल्ड (COVISHIELD) या सीरम इन्स्टिट्युटच्या (Serum Institute of India) तर भारत बायोटेकच्या (Bharat Biotech) कोवॅक्सिनला (COVAXIN) मंजुरी दिली आहे. तज्ञ समितीच्या शिफारसीनंतर आता डीसीजीआयच्या अंंतिम मंजुरीकडे सार्‍यांचे लक्ष लागले होते. अपेक्षेनुसार आज त्यांनी देखील मंजुरी दिली आहे. दरम्यान या लसी सुरक्षित आणि प्रभावी असल्याचं सांगण्यात आले आहे. प्री क्लिनिकल आणि क्लिनिकल ट्रायल्स मध्ये सुरक्षित असल्याचं म्हटलं आहे. ही माहिती भारताचे ड्रग्स कंट्रोलर ऑफ इंडिया डॉ. सोमाणी यांनी केली आहे. आज त्यांनी भारतातील तिसरी लस झायडस कॅडिला याला अद्याप तिसर्‍या टप्प्यातील चाचणीसाठी अजून काम सुरू असल्याची माहिती दिली आहे. त्यासाठी त्यांना तिसर्‍या टप्प्यातील मानवी चाचणीसाठी मंजुरी दिली आहे. COVID-19 Vaccination in India: केवळ आरोग्यसेवक आणि कोरोना योद्धांनाच मिळणार मोफत लस; डॉ. हर्षवर्धन यांचं स्पष्टीकरण.

सीरम इन्स्टिट्युट ऑफ इंडिया ही जगातील सर्वात मोठी लस उत्पादक कंपनी आहे. पुण्यातील या कंपनीने युनिव्हर्सिटी ऑफ ऑक्सफर्ड आणि अ‍ॅस्ट्राझेनेका सोबत करार केला आहे. या कंपनीने 40 मिलियन डोस बनवलेले आहेत. अदार पुनावाला यांनी ट्वीट करत कोविशिल्ड ही भारतामध्ये आपत्कालीन वापरामध्ये मंजुरी मिळवणारी पहिली लस असल्याचं सांगत यामागे कष्ट करणार्‍या सार्‍यांचे अभिनंदन करत आभारही मानले आहेत. कोविशिल्ड येत्या काही आठवड्यात बाजारात उपलब्ध होईल असेही त्यांनी म्हटलं आहे.

अदार पुनावाला यांचं ट्वीट

भारताच्या केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी देखील काल दिल्लीत ड्राय रनचा आढावा घेताना पहिल्या टप्प्यातील 3 कोटी कोविड योद्धांची लस मोफत असेल अशी माहिती दिली होती. जुलै महिन्यापर्यंत पहिल्या 27 कोटी उर्वरित प्राधान्यक्रमानुसार उमेदवारांना लस देण्याबाबत विचार होऊ शकतो असे स्पष्ट केले आहे. त्यामुळे डॉक्टर, आरोग्य कर्मचारी, पोलिस, कोविड योद्धे यांच्यासह 50 वर्षावरील आणि सहव्याधी असणार्‍यांना प्रामुख्याने लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यांत समाविष्ट करून घेण्याचा मानस आहे.

भारतामध्ये कोविड बाधितांचा आकडा 1 कोटीच्या पार गेला आहे. दिलासादायक बाब म्हणजे रिकव्हारी रेट 96% च्या पार आहे. पण लसीकरण ही समाजात कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी तसेच हर्ड इम्युनिटी तयार करण्याला  मदत करणार असल्याने आता लसीकरणाची प्रक्रिया कशी राबवली जाते याकडे सार्‍यांचे लक्ष लागले आहे.