Covaxin (Photo Credits: Bharat Biotech)

Covaxin Vaccine Adverse Events: काही दिवसांपूर्वी ब्रिटिश फार्मास्युटिकल कंपनी ॲस्ट्राझेनेकाने (AstraZeneca) घोषणा केली की, ते जगभरातून त्यांची कोविड-19 लस 'कोविशील्ड' मागे घेत आहेत. 'कोविशील्ड'बद्दल आरोप केले जात आहेत की, या लसीमुळे थ्रोम्बोसिस विथ थ्रोम्बोसाइटोपेनिया सिंड्रोम (TTS) नावाचा दुर्मिळ आजार होऊ शकतो. भारतामध्येही ही लस मोठ्या प्रमाणावर देण्यात आली होती. आता कोविशील्डप्रमाणेच कोवॅक्सिन (Covaxin) लसीचेही दुष्परिणाम समोर येत आहेत.

कोविशील्ड विकसित करणाऱ्या ॲस्ट्राझेनेकाने या ब्रिटीश कंपनीने नुकतेच तेथील न्यायालयात कबूल केले होते की, त्यांच्या लसीमुळे काही लोकांना गंभीर आजार होऊ शकतो. त्याचप्रमाणे आता भारत बायोटेक कंपनीच्या ‘कोवॅक्सिन’ या स्वदेशी लसीच्या दुष्परिणामांबाबतही अहवाल समोर आला आहे. दावा करण्यात आला आहे की, ही लस घेतल्यानंतर सुमारे एक वर्ष त्याचे दुष्परिणाम मोठ्या संख्येने लोकांमध्ये दिसून आले. याचा सर्वाधिक फटका किशोरवयीन मुलांना बसला. काही दुष्परिणाम तर खूप गंभीर होते.

'इकॉनॉमिक टाईम्स' या व्यावसायिक वृत्तपत्रातील वृत्तानुसार, या लसीच्या दुष्परिणामांवर 'निरीक्षणात्मक अभ्यास' करण्यात आला. यामध्ये लसीकरण झालेल्या एक तृतीयांश लोकांमध्ये काही, विशेष स्वारस्य असलेल्या प्रतिकूल घटना आढळून आल्या. हा अभ्यास अहवाल स्प्रिंगरलिंक जर्नलमध्ये प्रकाशित करण्यात आला आहे. हा अभ्यास बनारस हिंदू विद्यापीठाच्या सांखा शुभ्रा चक्रवर्ती आणि त्यांच्या टीमने केला आहे. अहवालानुसार, लसीकरण झालेल्या बहुतेक लोकांमध्ये एक वर्षासाठी दुष्परिणाम दिसून आले. या अभ्यासात 1,024 लोकांचा समावेश करण्यात आला होता. यामध्ये 635 किशोर आणि 391 तरुण होते. या सर्वांना लसीकरणानंतर एक वर्षानंतर फॉलो-अप तपासणीसाठी संपर्क करण्यात आला.

अभ्यासात, 'व्हायरल अप्पर रेस्पीरेटरी ट्रॅक्ट इन्फेक्शन' हे 304 किशोरवयीन मुले म्हणजे सुमारे 48 टक्के लोकांमध्ये दिसून आले. अशी परिस्थिती 124 म्हणजेच 42.6 टक्के तरुणांमध्येही दिसून आली. अहवालानुसार, किशोरवयीन मुलांमध्ये सामान्य विकार (10.2 टक्के), आणि मज्जासंस्थेचे विकार (4.7 टक्के) दिसून आले. प्रौढांमध्ये सामान्य विकार (8.9 टक्के), मस्कुलोस्केलेटल विकार (5.8 टक्के), आणि मज्जासंस्थेचे विकार (5.5 टक्के) दिसले. (हेही वाचा: WHO Warns To Reduce Salt Intake: जास्त मीठ खाणारे व्हा सावध! हृदयविकाराने युरोपात दररोज 10, 000 लोकांचा मृत्यू, डब्ल्यूएचओने दिला इशारा)

यामधील 4.6 टक्के महिला सहभागींमध्ये मासिक पाळीतील असामान्यता आढळून आली. तर 2.7 टक्के आणि 0.6 टक्के सहभागींमध्ये अनुक्रमे डोळ्यातील विकृती आणि हायपोथायरॉईडीझम दिसून आले. सुमारे 1 टक्के लोकांमध्ये गंभीर दुष्परिणाम दिसून आले. यामध्ये स्ट्रोकची समस्या 0.3 टक्के (म्हणजे 300 पैकी एक व्यक्ती) आणि 0.1 टक्के लोकांमध्ये गुइलेन-बॅरे सिंड्रोम (Guillain-Barre Syndrome) आढळला.