People Withdrawals EPF During Lockdown: पर्याय खुंटला! लॉकडाऊन काळात नागरिकांनी 'ईपीएफ'मधून काढले तब्बल 40,000 कोटी रुपये, महाराष्ट्र अव्वल
Poverty | Image Used For Representational purpose Only | Photo Credits: Pixabay.com

कोरोना व्हायरस (Coronavirus) संकट काळात लागू करण्यात आलेला लॉकडाऊन (Lockdown) सर्वसामान्य नागरिकांच्या आयुष्याला हादरा देणारा ठरला आहे. हाताला काम नाही, नोकरीची शाश्वती नाही, जवळची बचतही संपली अशा विमनस्क अवस्थेत नागरिकांना या काळात आपली अंतिम बचत असलेल्या भविष्य निर्वाह निधी (EPF) काढावा लागला आहे. लॉकडाऊन काळात आर्थिक गर्तेत अडकलेल्या नागरिकांनी आतापर्यंत तब्बल 40,000 कोटी रुपये भविष्य निर्वाह निधीतून काढले आहेत. कामगार व रोजगार राज्यमंत्री - स्वतंत्र प्रभार (एमओएस - आयसी) संतोष कुमार गंगवार (Santosh Kumar Gangwar) यांनी लोकसभेत माहिती देताना सांगितले की, लॉकडाऊन काळात नागरिकांनी आपल्या भविष्य निर्वाह निधूनत तब्बल 40,000 कोटी रुपये काढले आहेत. महत्त्वाचे असे की, नागरिकांनी 25 मार्च ते 31 ऑगस्ट या काळात इतक्या मोठ्या प्रमाणावर रक्कम काढण्यात आल्याचे गंगवार म्हणाले. संसदेचे हिवाळी अधिवेशन सध्या सुरु आहे. अधिवेशनादरम्यान विचारण्यात आलेल्या एका प्रश्नाच्या उत्तरादाखल केंद्रीय मंत्री संतोष कुमार गंगवार बोलत होते.

गंगवार यांनी माहिती देताना सांगितले की, भविष्य निर्वाह निधीतून सर्वाधिक रक्कम ही महाराष्ट्रातून काढण्यात आली. कोरोना व्हायरस लॉकडाऊन काळात महाराष्ट्रातून तब्बल 7,837.85 कोटी रुपये इतकी रक्कम काढण्यात आली. महाराष्ट्राच्या खालोखाल कर्नाटक (5,743.96 कोटी रु.) तमिळनाडू (4,984.51 कोटी रु.), दिल्ली (2,940.97 कोटी रुपये) आणि तेलंगना राज्यातून 2,619.39 कोटी रुपये इतकी रक्कम काढण्यात आली. या पाच राज्यांनंतर मग इतर राज्यांचा क्रमांक लागतो. (हेही वाचा, EPFO FY20 Interest: नोकररादारांना पीएफ खात्यामध्ये 8.5% दराने एका हप्त्यात व्याज मिळणार - रिपोर्ट्स)

कोरोना व्हायरस संकट देशात दाखल झाले होते. देशातील राज्यांना त्याची चाहुल लागताच राज्य सरकारने लॉकडाऊन करण्याच्या दिशेने पावले टाकत होती. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक दिवस (24 मार्च) अचानक रात्री आठ वाजता घोषणा केली की संपूर्ण देश लॉकडाऊन करण्यात येत आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे राज्य सरकारांनाही सर्व काही ताबडतोबत स्थगित अथवा थांबवण्यापासून पर्याय उरला नाही. परिणामी सर्व राज्यांसोबत अवघा देश लॉकडाऊन झाला.

लॉकडाऊन काळात प्रचंड मोठ्या प्रमाणावस स्थलांतर झाले. हे स्थलांतर जसे आंतर जिल्हा होते तसेच ते आंतरराज्य ही होते. घरात बसावे लागल्याने हातावरचे पोट असलेल्यांची आणि नियमीत नोकरदारांचीही मोठी गोची झाली. जे वर्क फ्रॉम होम या संकल्पनेत काम करत होते त्यांना काहीसा दिलासा भेटला. मात्र, ज्यांना हे शक्य नव्हते त्यांना मात्र आर्थिक अडचणींचा समना करावा लागला. त्यातच जवळची पुंजी संपत आल्याने नागरिकांना स्थलांतर करण्यावाचून पर्याय राहिलानाही. देशभरातील अनेक नागरिकांनी 12 ते 14,15 किलोमीटर अंतर रस्तेमार्गे चालत पार केले. लोक मिळेल त्या मार्गाने, पर्यायाने स्थलांतर करत होते. या सर्वांचा फटका मजूर तुटवडा, उद्योग-व्यवसाय मंदावने आणि आर्थिक क्षेत्रावर मोठ्या प्रमाणावर झाला आहे. परिणामी भविष्य निर्वाह निधीतून रक्कम काढणाऱ्यांची संख्या आणि रक्कम दोन्ही मोठ्या प्रमाणावर वाढत आहे.