छत्तीसगड विधानसभा निवडणूक 2023 (Chhattisgarh Assembly Election 2023) च्या पहिल्या टप्प्यासाठी 20 मतदारसंघांमध्ये आज (7 नोव्हेंबर) मतदान पार पडत आहे. पहिल्या टप्प्यासाठी 223 उमेदवारांचे भवितव्य अंदाजे 40,78,681 मतदार ठरवणार आहेत. प्रमुख उमेदवारांमध्ये भाजपकडून माजी मुख्यमंत्री डॉ. रमण सिंग आणि सत्ताधारी काँग्रेसकडून मोहम्मद अकबर मैदानात आहेत. विधानसभा मतदानाचा दुसरा टप्पा 17 नोव्हेंबरला पार पडत आहे. या निवडणुका नियोजीतपणे दोन टप्प्यात पार पडत आहेत. सुरक्षित मतदान प्रक्रिया सुनिश्चित करण्यासाठी निवडणूक आयोगाकडून आवश्यक पावले उचलण्यात आली आहे. संवेदनशील भागात, विशेषतः नक्षलग्रस्त बस्तर विभागातील 600 हून अधिक मतदान केंद्रांना सुरक्षा कवच प्रदान करण्यात आले आहे. त्यासाठी तीन-स्तरांची व्यवस्था करण्यात आली आहे.
काँग्रेस विरुद्ध भाजपा जोरदार सामना
छत्तीसगड विधानसभा निवडणुकीचा प्रचार काही विशेष मुद्द्यांनी गाजला. यात महादेव गेमिंग अॅपशी संबंधित कथित घोटाळे आणि "हवाला मनी फंडिंग" यावर भाजपने मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस सरकारवर निशाणा साधला. "भ्रष्टाचार" आणि धानाची किंमत हे निवडणुकीतील प्रमुख मुद्दे प्रचारादरम्यान समोर आले आहेत. भाजपद्वारे करण्यात आलेल्या आरोपाला काँग्रेसनेही जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. काँग्रेसने भाजपच्या आरोपांचे खंडन करत म्हटले की, केंद्रातील सत्ताधारी पक्ष राजकीय फायदा मिळवण्यासाठी सीबीआय आणि ईडी सारख्या तपास यंत्रणांचा वापर केला आहे. ओबीसी आणि आदिवासींची मोठी लोकसंख्या असलेल्या राज्यात जातीय घटक देखील महत्त्वाचे ठरत असल्याने राजकीय पक्ष जायीत कार्डही खेळत आहेत. दोन्ही पक्षांनी राज्यातील सुमारे 38 लाख शेतकऱ्यांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला आहे. राज्याच्या लोकसंख्येच्या 30 टक्क्यांहून अधिक लोकसंख्या अनुसूचित जमातींचा आहे. 2018 पर्यंत राज्यात लागोपाठ तीन निवडणुका भाजपने जिंकल्या पण भाजपला 2018 मध्ये वाईटरित्या पराभव स्वीकारावा लागला.
एएनआय एक्स पोस्ट
Voting for the first phase of Chhattisgarh Assembly Elections 2023 begins.
Twenty of the 90 assembly seats will be voting in the first phase of polls. Over 40 lakh electors will vote across 5,304 polling stations in the first phase. pic.twitter.com/HTHM9J39nj
— ANI (@ANI) November 7, 2023
निवडणूक प्रचारातील प्रमुख मुद्दे
जात जनगणना, कर्जमाफी, गॅस सिलिंडर सबसिडी, बेरोजगारी, नोकऱ्या आणि गरिबांसाठी घरे हे इतर मुद्दे या निवडणुकीत प्रचारादरम्यान प्रामुख्याने उपस्थित करण्यात आले. काँग्रेसने राजीव गांधी न्याय योजनेंतर्गत देण्यात येणाऱ्या इनपुट सबसिडीसह 3,200 रुपये प्रति क्विंटल (20 एकर प्रति क्विंटल) धान खरेदीचे आश्वासन दिले आहे. तर, काँग्रेसच्या एक दिवस आधी आपला जाहीरनामा प्रसिद्ध करणाऱ्या भारतीय जनता पक्षाने 'कृषी उन्नती योजने'चे आश्वासन दिले आहे, ज्या अंतर्गत प्रति एकर 21 क्विंटल धान 3,100 रुपये दराने खरेदी केले जाईल.