Rerserve Bank of India. (Photo Credit: PTI)

मंगळवारी केंद्र सरकारने (Central Government) अल्प बचत योजनांमध्ये (Small Savings Schemes) गुंतवणूक करणार्‍यांना मोठा धक्का दिला आहे. या योजनांवरील व्याज दर (Interest Rates) आर्थिक वर्ष 2020-21 च्या पहिल्या तिमाहीत (एप्रिल-जून) कमी करण्यात आला आहे. ही कपात 0.70% ते 1.4% पर्यंत आहे. पीपीएफ (PPF) वरील व्याज दरात ०.8% कपात केली गेली आहे, तर पोस्ट ऑफिस टाईम डिपॉझिट (पोस्ट ऑफिस मुदत ठेवी) वरील व्याज दरात 1.4% कपात केली आहे. त्याच वेळी सुकन्या समृद्धि योजनेच्या (Sukanya Samriddhi Yojana) व्याजदरामध्ये 0.8% कपात केली आहे. अशाप्रकारे एकीकडे देशातील नागरिक आर्थिक संकटांचा सामना करीत असताना, सरकारने त्यात अजूनच भर घातली आहे.

नवीन दर जाहीर झाल्यानंतर पीपीएफला आता 7.1% व्याज मिळेल, जो याआधी 7.9% होता. त्याच वेळी, राष्ट्रीय बचत योजनांना आता 6.8% व्याज मिळेल, आधी त्यावर 7.9% व्याज मिळत होते. त्यानंतर सुकन्या समृद्धि योजनावर आता 7.6% व्याज मिळेल, जे पूर्वी 8.4% होते. किसान विकास पत्रात दरवर्षी 7.6 टक्के व्याज दर मिळत होते, जे आता कपातीनंतर 6.9 टक्के झाला आहे. फिक्स उत्पन्नावर अवलंबून असणाऱ्या लोकांसाठी, विशेषत: ज्येष्ठ नागरिकांसाठी, जे नियमित उत्पन्नाचे स्त्रोत म्हणून व्याज देयकावर अवलंबून असतात अशांसाठी ही फार धक्कादायक बाब ठरत आहे. (हेही वाचा: Coronavirus: लॉकडाऊन नंतर गगनाला भिडू शकतात सोन्याच्या किंमती; पार करेल 50 हजाराची पातळी- तज्ञांचा इशारा)

दरम्यान, बँकांनी अलीकडेच मुदत ठेवींवरील व्याजदरातही कपात केली आहे. टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, एसबीआयच्या एका वर्षाच्या एफडीला ऑगस्ट 2004 नंतर प्रथमच 6% पेक्षा कमी व्याज दिले जात आहे. नवीन दर जाहीर झाल्यानंतर एका वर्षाच्या पोस्ट ऑफिस एफडीला 5.5% व्याज मिळेल, तर पाच वर्षांच्या एफडीवर 6.7% व्याज दिले जाईल. आयकर कायदा 1961 च्या कलम 80C अंतर्गत पाच वर्षांच्या मुदतीच्या ठेवीवर कर लाभाचा फायदा मिळतो. सरकार या बचत योजनांवर दर तिमाहीवर व्याज दर ठरवते. केंद्र सरकारने छोट्या बचत योजनांवरील व्याज दर सुमारे एक वर्षानंतर कमी केला आहे.