देशातील कोरोना विषाणू (Coronavirus) च्या साथीमुळे अर्थव्यवस्थेला जरी मंदीचा धोका निर्माण होत असला, तरी अशा आपत्कालीन परिस्थितीत मौल्यवान धातू म्हणजेच सोन्यात दरात (Gold Rate) प्रचंड वाढ होऊ शकते. बाजार तज्ज्ञांच्या मते, लवकरच भारतातील सोने प्रति ग्रॅम 50 हजार रुपये अशी ऐतिहासिक पातळी ओलांडू शकेल. सोने ही गुंतवणूकदारांची नेहमीच पहिली पसंती असते आणि संकटाच्या वेळी ती फार मोठा आधार ठरते. मात्र आता लॉक डाऊन संपल्यावर सोन्याचे भाव गगनाला भिडू शकतात. आज मुंबईच्या सराफा बाजारात सोन्याचा भाव 41,740 प्रति 10 ग्रॅम होता.
याबाबत बोलताना इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनचे राष्ट्रीय सचिव सुरेंद्र मेहता म्हणाले की, लवकरच सोन्याची किंमत 50,000 रुपयांच्या वर जाईल आणि ती प्रति 10 ग्रॅम 52 हजार इतक्या उच्च पातळीला पोहचू शकते.’ जेव्हा आर्थिक आकडेवारीत घट येते तेव्हा गुंतवणूकदारांचा सोन्याकडे कल वाढेल. त्यात लॉकडाऊन संपल्यावर अक्षय तृतीयाचा सण साजरा होईल, ज्यादिवशी सोन्याची विक्री वाढण्याची शक्यता आहे. सध्या भारतीय बाजारात गेल्या एका महिन्यात सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम 38,400 ते 44,961 रुपयांच्या दरम्यान राहिली आहे. (हेही वाचा: कोरोना व्हायरस संकटामुळे जगात मंदी पण Indian Economy मात्र सुरक्षित - संयुक्त राष्ट्र)
या विषयी बाजार तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, कोरोना संकटाला तोंड देण्याच्या प्रयत्नात अमेरिकेच्या केंद्रीय बँक फेडरल रिझर्व्हसह अनेक देशांच्या मध्यवर्ती बँकांनी व्याज दरात कपात केली असून, त्याचा फायदा सोन्याला होईल. यामुळे, येत्या काही दिवसांत या पिवळ्या धातूमध्ये जबरदस्त तेजी येऊ शकते. सध्या शेअर बाजाराची घसरण आणि सोन्याच्या किंमती ही 2008 च्या मंदीसारखी दिसत आहे. त्यानंतर 2011 मध्ये सोन्याची दाराची नोंद प्रति औंस 1,911.60 डॉलर झाली होती.