Bharat Bandh 2020: शेतकरी आणि कामगार संघटनांकडून आज देशव्यापी 'भारत बंद'ची हाक; 25 कोटी लोकांचा सहभाग, जाणून घ्या काय होणार परिणाम
Bandh or Strike. Representative Image | (Photo Credits: PTI)

देशातील शेतकरी आणि कामगार संघटनांनी आज, 8 जानेवारी रोजी सरकारच्या लोकविरोधी आर्थिक धोरणांच्या विरोधात भारत बंदची (Bharat Bandh 2020) घोषणा केली आहे. या भारत बंदमध्ये 25 कोटी लोक सहभागी होणार असल्याचा दावा केला जात आहे. अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समिती अंतर्गत, देशभरातील 250 हून अधिक शेतकरी संघटनांनी आज भारत बंदची हाक दिली आहे.

भारत बंद यशस्वी करण्यासाठी संघर्ष समितीच्या वतीने खेड्यांमध्ये पत्रके वाटप करण्यात आली आहेत आणि दूध, भाजीपाल्यासह कोणतेही उत्पादन शहरात जाणार नाही, असे आवाहन शेतकऱ्यांना केले आहे. आज होत असलेल्या या भारत बंदला 6 बँक संघटनांनीही पाठिंबा दर्शविला आहे.

देशातील बँकाही या बंदमध्ये सहभागी होत असल्याने, बँकिंग कारभारावर याचा परिणाम होईल. बँक बंद असल्याने एटीएम सेवेवर याचा परिणाम होईल आणि 8-9 जानेवारी रोजी रोखीची कमतरता भासू शकेल. केंद्रीय कामगार संघटनांनी श्रम सुधार, थेट परकीय गुंतवणूक आणि खासगीकरण यासारख्या केंद्र सरकारच्या धोरणांच्या विरोधात बुधवारी देशव्यापी संप पुकारला आहे. कार्मिक मंत्रालयाने जारी केलेल्या आदेशात कर्मचा्यांना या संपापासून दूर राहण्याचा इशारा देण्यात आला आहे. कर्मचारी या संपत सहभागी झाल्यास वेतन कपात करण्याशिवाय त्याच्याविरूद्ध शिस्तभंगाची कारवाई देखील होऊ शकते. या संपात बँकिंग, कोळसा, तेल, संरक्षण, सार्वजनिक क्षेत्र आणि वाहतूक क्षेत्रातील कर्मचारी सहभागी होतील.

दरम्यान, सेंट्रल ट्रेड यूनियनने आजच्या संपामुळे वैद्यकीय व अभियांत्रिकी प्रवेश परीक्षा जानेवारीच्या दुसर्‍या आठवड्यात पुढे ढकलण्याची विनंती केली आहे. कामगार संघटनेने सप्टेंबरमध्येच सरकारविरोधी धोरणांच्या विरोधात 8 आणि 9 जानेवारी रोजी संप करण्याची योजना आखली होती.

संपात कोण सहभागी होणार -

INTUC, AITUC, HMS, CITU, AIUTUC, TUCC, SEWA, AICCTU, LPF, UTUC आणि इतर अनेक क्षेत्रीय स्वतंत्र महासंघ आणि संघटना या संपामध्ये सहभागी आहेत.

ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशन (AIBEA), ऑल इंडिया बँक ऑफिसर असोसिएशन (AIBOA), BEFI, INBEF, INBOC आणि बँक एम्प्लॉईज आर्मी फेडरेशन (BKSM) यांनी या संपाला पाठिंबा देणार असल्याचे म्हटले आहे. (हेही वाचा: Bank Bandh On 8 January: भारत बंद मध्ये सहभागी कर्मचाऱ्यांमुळे उद्या बँक बंद? ATM सेवेवर सुद्धा होऊ शकतो परिणाम)

याशिवाय 60 विद्यार्थी संघटना, विद्यापीठांच्या अधिका्यांनीही संपात भाग घेण्याची घोषणा केली आहे. शैक्षणिक संस्थांमध्ये फी वाढविणे आणि शैक्षणिक व्यावसायीकरण करणे यास ते विरोध करतील.

बंद दरम्यान शेतकरी शेतीची कोणतीही कामे करणार नाहीत. शेती उत्पादने भाजीपाला, दूध, अंडी, मासे विक्री करणार नाही किंवा या गोष्टी खेड्यातून शहरात येणार नाहीत. कृषी उत्पन्न बाजारदेखील आज बंद राहतील. विविध ठिकाणी निदर्शने व मोर्चा काढण्यात येणार आहे. या बंदचा परिणाम वाहतूक मार्गावरही होऊ शकतो, त्यामुळे घराबाहेर पडताना परिस्थितीचा आढावा घेऊनच बाहेर पडा.

याबाबत बोलताना संघर्ष समितीचे संयोजक व्ही. एम. सिंह म्हणाले की, '2014 मध्ये भाजपा सरकारने देशातील शेतकऱ्यांना आश्वासन दिले होते की, पिकासाठी किमान दीडपट आधारभूत किंमत दिली जाईल, जे 2019 पर्यंत पूर्ण होऊ शकले नाही. यामुळे या भारत बंदचा उद्देश शेतकऱ्यांच्या मागण्या लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी सरकारला जागृत करणे हे आहे.'