Bank Bandh On 8 January: भारत बंद मध्ये सहभागी कर्मचाऱ्यांमुळे उद्या बँक बंद? ATM सेवेवर सुद्धा होऊ शकतो परिणाम
Bank Bandh| (Photo Credits: PTI)

Bank Strike: केंद्र सरकार (Central Government) आर्थिक धोरणांच्या विरोधी उद्या, 8 जानेवारी रोजी सरकारी कर्मचाऱ्यांनी देशव्यापी संपाची हाक दिली आहे. या भारत बंद (Bharat Bandh) मध्ये बँकांचे हजारो कर्मचारी देखील संपावर जाण्याची शक्यता असल्याने साहजिकच बँक व एटीएम सेवा (ATM Service)  देखील बंद असू शकतात. दरम्यान, आज महाराष्ट्र सरकार (Maharashtra Government) तर्फे शासकीय कर्मचाऱ्यांना पूर्वसूचना देत संपात सहभागी न होण्यास सांगण्यात आले आहे, असे केल्यास त्यांच्यावर शिस्तभंगतेची कारवाई केली जाईल असेही सांगण्यात आले आहे मात्र असे असले तरी या बंद साठी 10 केंद्रीय व्यापारी संघटना, डावे पक्ष आणि अनेक बँकाच्या कर्मचाऱ्यांचा पाठिंबा आहे त्यामुळे बंद होणार असल्याची शक्यता नाकारता येत नाही. असे झाल्यास तुमची कामे अडून राहू नये यासाठी आजच बँक व्यवहार उरकून घेणे फायद्याचे ठरेल.

प्राप्त माहितीनुसार, द ऑल बँक ऑफिसर्स कॉन्फीडेरेशन (AIBOC) तर्फे सर्व बँक कर्मचाऱ्यांना उद्या काम न करण्याचे इतकेच काय तर कार्यलय उघडण्यासाठी चाव्या सुद्धा न घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. त्यामुळे क्लेरिकल सहित सर्वच कामे ठप्प असण्याची शक्यता आहे.

बँकांची भूमिका काय?

-सरकारी बँक म्हणजेच स्टेट बँक ऑफ इंडिया ने आपल्या संस्थेतील अगदी काहीच टक्के कर्मचारी हे संघटनांचा भाग असल्याने या बंदचा परिणाम अगदी कमीत कमी असेल असे सांगितले आहे.

-बँक ऑफ बडोदा बँकेने आपल्या कर्मचाऱ्यांकडून संप पळाला जाणार असल्याचे सांगत उद्याच्या बँक स्ट्राईक मुळे व्यवहार विलंबाने अथवा पूर्णतः ठप्प असण्याची शक्यता वर्तवली आहे.

- ऑनलाईन बँकिंग मात्र यामुळे अजिबात प्रभावित होणार नाही, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या अंतर्गत चालणाऱ्या NEFT मधून नेहमीप्रमाणे 24 तास व्यवहार सुरु असतील.

दरम्यान, सध्या समोर येणाऱ्या दाव्यानुसार उद्याच्या संपात तब्बल 25 कोटी कर्मचारी सहभागी होणार असल्याचे अंदाज आहेत, नरेंद्र मोदी सरकारच्या आर्थिक धोरणांचा निषेध, पगारवाढ, कामाचे तास अशा अनेक उद्दिष्टांनी प्रेरित उद्याचा भारत बंद पुकारण्यात आला आहे.