मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय मंत्रालयाच्या पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय विभागाच्या निदर्शनास आले आहे की समाज माध्यमांवर सध्या एक अहवाल दाखवला जात आहे ज्यामध्ये असे म्हटले आहे की जागतिक आरोग्य संघटनेने भारत सरकारला पाठवलेल्या एका कथित मार्गदर्शक सूचनेनुसार जर दूध आणि दुग्धजन्य पदार्थांमध्ये होत असलेली भेसळ वेळीच थांबवली नाही तर 2025 पर्यंत देशातील 87 % पेक्षा अधिक नागरिकांना कर्करोगासारख्या गंभीर आजारांना सामोरे जावे लागेल. अशा प्रकारच्या चुकीच्या माहितीच्या प्रसारामुळे ग्राहकांमध्ये विनाकारण संभ्रम निर्माण होत आहे.याविषयी विभागाने दिलेल्या माहितीनुसार या संदर्भात, भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण (FSSAI) समवेत सल्लामसलत करून या प्रकरणाची विभागामध्ये तपासणी केली गेली आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या भारतातील कार्यालयाने भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण(FSSAI) ला स्पष्ट केले आहे की जागतिक आरोग्य संघटनेने अशा प्रकारची कोणतीही मार्गदर्शक सूचना भारत सरकारला पाठवलेली नाही.
अशाप्रकारे समाज माध्यमे आणि व्हॉट्सअप वर पसरत असलेल्या चुकीच्या माहितीवर कोणत्याही परिस्थितीत विश्वास ठेवू नये, याचा विभागाने पुनरुच्चार केला आहे. संपूर्ण देशातील ग्राहकांना सुरक्षित आणि चांगल्या दर्जाच्या दुधाचा पुरवठा करण्यासाठी केंद्रीय पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय विभाग आणि भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण, शक्य ती सर्व पावले उचलत आहे. याशिवाय विभागाने 2021 मध्ये पशुसंवर्धनाविषयी प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार 2018-19 या वर्षात देशाचे दैनंदिन दुग्ध उत्पादन, समाज माध्यमांमधील वृत्तानुसार प्रतिदिन 14 कोटी लिटर नव्हे तर प्रतिदिन 51.4 कोटी किलोग्रॅम इतके होते. देशातील दूध उत्पादन 2014-15 मधील 146.3 दशलक्ष टनांवरून 2021-22 मध्ये 221.06 दशलक्ष टन (66.56 कोटी लिटर प्रतिदिन) इतके वाढले असून वार्षिक वृद्धी दर 6.1% इतका झाला आहे. (हे ही वाचा:- New Social Media Guidelines for CRPF Personnel: 'राजकीय भाष्य टाळा' सीआरपीएफ कर्मचाऱ्यांसाठी नवी सोशल मीडिया मार्गदर्शक तत्वं जारी; घ्या जाणून)
विभागाने 2019 मध्ये दूध आणि दुग्धजन्य पदार्थांची देशातील मागणी जाणून घेण्यासाठी अभ्यास केला होता. या अभ्यासानुसार 2019 मध्ये संपूर्ण भारतात दूध आणि दुग्धजन्य पदार्थांचा एकूण वापर 162.4 दशलक्ष मेट्रिक टन (44.50 कोटी किलोग्राम प्रतिदिन) होता. यावरून हे दिसून येते की देशातील दुग्ध उत्पादन देशांतर्गत मागणी पूर्ण करण्यासाठी पुरेसे आहे.बाजारात विक्रीला येणारे दुध आणि दुग्धजन्य पदार्थांची गुणवत्ता, भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण (FSSAI) द्वारे निर्धारित आणि लागू केलेल्या मानकांद्वारे नियंत्रित केली जाते (FSSAI) द्वारे शासित आणि अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण ऑफ इंडिया एआय द्वारे लागू केली जाते). राष्ट्रीय दूध सुरक्षा आणि गुणवत्ता सर्वेक्षण (NMQS-2018) ने अलीकडेच केलेल्या एका राष्ट्रस्तरीय सर्वेक्षणानुसार दुधाच्या 6,432 नमुन्यांपैकी केवळ 12 नमुन्यांमधील (0.19%) दूध हे भेसळयुक्त आढळल्यामुळे ते मानवाने सेवन करण्यासाठी असुरक्षित होते. ही चिंतेची बाब असली तरी भारतात द्रव दुधात मोठ्या प्रमाणावर भेसळ होते, हे वृत्त मात्र अतिशयोक्तिपूर्ण आणि वस्तुस्थितीला धरुन नाही.