केंद्र सरकार लसीकरण मोहिमेची (Vaccination Drive) तयारी करत असताना 50% हून अधिक भारतीय कोविड-19 ची लस (Covid-19 Vaccine) घेण्याबाबत चिंता दर्शवली आहे, असे एका सर्वेक्षणातून समोर आले. कोविड-19 मुळे संपूर्ण जग त्रासून गेले होते. परंतु, नुकतीच लसींना मंजूरी मिळाल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे. सर्व नागरिकांना लवकरात लवकर लस दिली जावी यासाठी लसीचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन सुरु आहे. कमी काळात आणि मोठ्या प्रमाणात होणाऱ्या उत्पादनामुळे लसीच्या क्षमतेवर आणि सुरक्षिततेवर काही प्रश्न उभे राहत आहेत. या अशा काळात लसीबद्दलचा सर्व्हे खूप महत्त्वाची भूमिका बजावतो. (भारतामध्ये कोरोना वायरस लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात 30 कोटी भारतीयांना मिळणार लस; गाईडलाईन्स जारी)
लस घेण्याबद्दल नागरिकांचे मत जाणून घेण्यासाठी 11 हजार नागरिकांचा सर्व्हे करण्यात आला. यामध्ये कोविड-19 विरुद्ध लढण्यासाठी सरकारने उचललेल्या पावलांबद्दल लोकांकडून प्रतिक्रीया जाणून घेण्यात आल्या. GOQii ने घेतलेल्या सर्व्हेनुसार 53 टक्के नागरिकांनी कोविड-19 विरुद्धची लस घेण्याबाबत चिंता व्यक्त केली आहे. तर 43 टक्के नागरिक लसीचा परिणाम पाहून लस घ्यायची की नाही हे ठरवणार असल्याचं सर्व्हेतून समोर आलं आहे. सध्या 10 टक्के लोक लस घेण्याला नकार दर्शवत आहेत. 47 टक्के ही लस घेण्यासाठी तयार असून त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत, अशी सकारात्मक माहिती देखील या सर्व्हेक्षणातून समोर आली आहे.
एकूण नागरिकांपैकी 48 टक्के पुरुष लस घेण्यास तयार आहेत तर 42 टक्के महिलांनी कोविड-19 लस घेण्यास तयारी दर्शवली आहे. 45 ते 60 वयोगटातील व्यक्ती लस घेण्यास कमी इच्छुक असून 60 वर्षांवरील व्यक्तींना लस घ्यायची इच्छा नसल्याचे दिसून आले आहे. तर तरुणाई लस घेण्यासाठी खूप उत्सुक आहे.
जगातील 8 कोविड-19 लसींपैकी 3 लसी या विकासाच्या शेवटच्या टप्प्यात त्यांना लवकरच मान्यता मिळण्याची शक्यता आहे. यामध्ये अॅस्ट्रॅजेनेका आणि ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीने बनवलेली कोविशिल्ड, भारत बायोटेकची Covaxin, Zydus Cadila विकसित ZyCoV-D, रशियाने विकसित केलेली Sputnik-V, SII ने विकसित केलेली NVX-CoV2373 आणि Geneva ने विकसित केलेली HGCO19 यांचा समावेश आहे.
तसेच सर्व्हे मधून असे समोर आले आहे की, 50 टक्के लोकांना कोविड-19 रोखण्यासाठी केंद्र सरकारने घेतलेली पाऊले उचित वाटली. तर 25 टक्के लोकांना राज्य सरकारने घेतलेले निर्णय योग्य वाटले. 22 टक्के सरकारने उचललेली पाऊलं निष्फळ असल्याचे वाटत आहे.
लॉकडाऊनचे नियम शिथिल करुन जनजीवन पूर्वपदावर आणावे हा योग्य मार्ग आहे असे 66 टक्के लोकांना वाटते. तर पुन्हा पूर्णपणे लॉकडाऊन करावे असे 34 टक्के लोकांना वाटते. 31 टक्के लोकांना लवकरात लवकर जनजीवन सुरळीत व्हावे असे वाटते. परंतु, त्यासाठी कोरोनाचे रुग्ण वाढणार नाहीत याची काळजी घेणे गरजेचे असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. सध्या कोणत्याही प्रकारच्या निर्बंधांची गरज नसून जनजीवन पूर्णपणे सुरळीत करावे असे 10 टक्के लोकांना वाटते.