मागील वर्षभर कोरोना वायरस संकटाचा सामना करत असलेल्या जगाला आता त्याचा फैलाव रोखण्यासाठी कोरोना लसीच्या रूपाने आशेचा किरण दिसला आहे. दरम्यान युके, अमेरिका सारख्या बलशाही देशांमध्ये कोरोना वायरसच्या लसीकरणाला सुरूवात झाल्यानंतर येत्या काही आठ्वड्यातच भारतामध्येही लसीकरणाला सुरूवात होऊ शकते अशी आशा आहे. या पार्श्वभूमीवर आता प्रशासनाच्या हालचालींना वेग आला आहे. सरकारकडून कोरोना लसीकरणाबाबत गाईडलाईन्स जारी करण्यात आल्या आहेत. सरकारच्या या गाईडलाईननुसार पहिल्या टप्प्यात 30 कोटी भारतीयांना लस देण्यासाठी प्रयत्न असल्याचं सांगितलं जात आहे.
दरम्यान कोरोना लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यामध्ये आरोग्य कर्मचारी, कोविड योद्धे यांचा समावेश असणार आहे. 1 कोटी आरोग्य कर्मचारी, 2 कोटी कोविड योद्धे तर 27 कोटी सामान्य नागरिकांचा यामध्ये समावेश असणार आहे. Covaxin Covid 19 Vaccine Update: SII पाठोपाठ Bharat Biotech चा देखील Emergency Use Authorisation साठी DCGI कडे अर्ज.
भारतामध्ये कशी राबवली जाऊ शकते कोरोना लसीकरणाची प्रक्रिया?
- प्रति दिवस एका सेशनमध्ये 100-200 लोकांना लस दिली जाईल. त्यानंतर काही दुष्परिणाम तर होत नाही ना? हे पाहण्यासाठी त्यांना किमान 30 मिनिटं देखरेखीखाली ठेवलं जाईल. यासाठी 5 जणांची टीम असेल.
- जागेचे स्वरूप, लसीकरणाची क्षमता पाहून ती एकावेळी 200 जणांसाठी वाढवण्याचा देखील विचार केला जाऊ शकतो.
- कोविड लसीच्या डिलेव्हरीसाठी खास डिजिटल प्लॅटफॉर्म केला जाणार आहे. यामध्ये लस दिल्या जाणार्यांचे ट्रॅकिंग केले जाईल.
- वोटर आयडी, आधार कार्ड, ड्रायव्हिंग लायसंस, पेन्शन डॉक्युमेंट यासारखी 12 महत्त्वाची कागदपत्र सेल्फ रजिस्ट्रेशनसाठी निवडण्यात आली आहे. ती सादर करूनच सेल्फ रजिस्ट्रेशन करता येईल.
- प्री रजिस्ट्रेशन करूनच संबंधित व्यक्तींना लस दिली जाईल. यामध्ये ऑन द स्पॉट लसीकरणासाठी रजिस्ट्रेशन नसेल. तसेच सरकारकडून प्राधान्यक्रमाने ज्यांना लस देण्यासाठी सांगितलं जाईल त्यांचाच या यादीमध्ये समावेश असेल.
- एका तालुक्याला एकाच लस कंपनीच्या लसीची मान्यता असेल. यामुळे एका पेक्षा अधिक लसींचा गोंधळ होणार नाही.
- दरम्यान लसीकरणासाठी आलेल्या औषधांच्या बाटल्या, थंडावा निर्माण करण्यासाठी उपलब्ध करून दिले जाणारे आईस पॅक्स यांना सुरक्षित ठेवण्यासाठी विशेष खबरदारी घेतली जाईल.
फायझर कंपनीच्या लसीकरणाला जगभरात अनेक ठिकाणी सुरूवात झाली आहे. भारतामध्येही हीलस प्रतिक्षेच्या यादीमध्ये आहे. यासोबतच देशात सीरम आणि भारत बायोटेक या दोन लसींच्या निर्मिती संस्थांनी DCGI कडे तातडीच्या वापराच्या मंजुरीसाठी अर्ज दाखल केला आहे.