4th Covid-19 Wave: जूनमध्ये येणार देशात कोविड-19 ची चौथी लाट; ऑक्टोबरपर्यंत संसर्गाचा धोका- Study
Coronavirus | Representational Image | (Photo Credits: PTI)

भारतातील कोरोना व्हायरसच्या (Coronavirus) ओमायक्रॉन प्रकारामुळे आलेली तिसरी लाट जवळपास संपली आहे. कोरोनाच्या रुग्णांमध्येही झपाट्याने घट होत आहे. संसर्ग कमी झाला आहे. अशात जर तुम्हाला असे वाटत असेल की कोरोनाव्हायरस संपला आहे आणि आता कोणताही धोका नाही, तर तुम्ही चुकीचे आहात. आयआयटी कानपूरच्या (IIT Kanpur) शास्त्रज्ञांनी कोविडच्या चौथ्या लाटेबद्दल (Fourth Covid-19 Wave) माहिती दिली आहे. 22 जूनच्या सुमारास देशात कोरोनाची पुढची लाट येऊ शकते, जी 24 ऑक्टोबरपर्यंत राहील, असे सांगितले जात आहे.

यापूर्वी कोविडशी संबंधित आयआयटीच्या शास्त्रज्ञांनी ज्या काही शक्यता व्यक्त केल्या होत्या त्या जवळपास खऱ्या ठरल्या आहेत. यावरून अंदाज वर्तवला जात आहे की कोविडची चौथी लाट तिसर्‍या लाटेपेक्षा थोडी जास्त काळ टिकू शकते. मात्र, शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे की चौथ्या लाटेचे संक्रमण कोरोनाच्या प्रकारावर अवलंबून असेल. हा सांख्यिकीय अंदाज 24 फेब्रुवारी रोजी प्रीप्रिंट सर्व्हर MedRxiv वर प्रकाशित केला आहे.

आयआयटी कानपूरच्या संशोधकांनी अशा प्रकारे देशात तिसऱ्यांदा कोविडची लाट येण्याची शक्यता वर्तवली आहे. हे संशोधन आयआयटी कानपूरच्या गणित आणि सांख्यिकी विभागातील साब्रा प्रसाद राजेशभाई, सुभ्रा शंकर धर आणि सलाभ यांनी केले आहे. संशोधकांचा अंदाज आहे की ही कोरोनाची चौथी लाट 15 ऑगस्ट ते 31 ऑगस्टपर्यंत पीकवर असेल आणि त्यानंतर संसर्गाची प्रकरणे कमी होऊ लागतील.

आपल्या अंदाजासाठी, संशोधन पथकाने सांख्यिकीय मॉडेल्सचा वापर केला आहे, ज्याच्या आधारावर अनुमान काढण्यात आले आहे की, देशात कोरोना विषाणूचा पहिला संसर्ग आढळल्यानंतर 936 दिवसांनी चौथी लाट येण्याची शक्यता आहे. चौथ्या लाटेत लसीकरणाचा परिणाम, बूस्टर डोस यासारखे विविध घटक संसर्गाच्या प्रमाणामध्ये महत्त्वाची भूमिका बजावतील. (हेही वाचा: दिलासादायक! केंद्र सरकारचा मोठा निर्णय; रस्ते अपघातात मृत्यू झाल्यास कुटुंबाला मिळणार 2 लाखांची भरपाई)

दुसरीकडे, डब्ल्यूएचओने म्हटले आहे की मे-जूनपर्यंत व्हायरसच्या पॅटर्नवर लक्ष ठेवावे लागेल. कोणतीही नवीन लाट न आल्यास ही महाम्री संपल्याचे घोषित केले जाईल. ओमायक्रॉनच्या प्रकारामुळेही कोणती नवी लाट आली नाही. कोरोनाची चौथी लाट आलीच तर त्याचा प्रभाव मलेरिया किंवा चिकुनगुनियासारखा असू शकतो.