दिलासादायक! केंद्र सरकारचा मोठा निर्णय; रस्ते अपघातात मृत्यू झाल्यास कुटुंबाला मिळणार 2 लाखांची भरपाई
Accident | (Photo Credit: Archived, edited, representative images)

देशात रस्ते अपघातांच्या घटना रोजच समोर येत आहेत. अशा अपघातांबाबत केंद्र सरकारने आता मोठे पाऊल उचलले आहे. 'हिट अँड रन' प्रकरणांमध्ये पिडीत व्यक्तीचा मृत्यु झाल्यास त्याच्या नातेवाईकांना मिळणाऱ्या भरपाईमध्ये वाढ करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. सरकार 1 एप्रिलपासून ही भरपाई 8 पट वाढवणार आहे. 1 एप्रिलपासून रस्ते अपघातात कुटुंबातील सदस्याचा मृत्यू झाल्यास त्यांच्या कुटुंबीयांना दोन लाख रुपये देण्यात येणार आहेत. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्या अधिसूचनेत ही माहिती देण्यात आली आहे.

तसेच अशा घटनांमध्ये गंभीर जखमी झालेल्या व्यक्तीला देण्यात येणारी भरपाई रक्कमही 12,500 रुपयांवरून 50,000 रुपये करण्यात आली आहे. मंत्रालयाने म्हटले आहे की या योजनेचे नाव 'हिट अँड रन मोटर अपघातातील बळींना भरपाई योजना, 2022' असे असेल आणि ती 1 एप्रिल 2022 पासून लागू होईल. एका प्रसिद्धीनुसार, मंत्रालयाने रविवारी सांगितले की, 'हिट अँड रन' मोटार अपघातातील पीडितांना भरपाईची अधिसूचना 25 फेब्रुवारी 2022 रोजी जारी करण्यात आली आहे, ज्यामध्ये भरपाईची रक्कम वाढवण्यात आली आहे. (हेही वाचा: रेल्वे प्रवासादरम्यान प्रवाशांना घेता येणार स्वादिष्ट भोजनाचा आनंद! देशातील 60 रेल्वे स्थानकांवर लवकरचं सुरू होणार RailRestro ची Food Service)

नुकसान भरपाईसाठी अर्ज करणे आणि पीडितांना भरपाई देणे या प्रक्रियेसाठीही कालमर्यादा निश्चित करण्यात आली आहे. दरम्यान, 2021 मध्ये महाराष्ट्रात 29,000 हून अधिक रस्ते अपघातांची नोंद झाली आणि या घटनांमध्ये 13,346 लोक मरण पावले आहेत. कोविड-19 पूर्वीपेक्षा हे प्रमाण चार टक्के अधिक आहे. एका अधिकाऱ्याने मंगळवारी याबाबत माहिती दिली. अपघातांच्या आकडेवारीनुसार, 2020 च्या तुलनेत गेल्या वर्षी राज्यातील रस्ते अपघातात 17 टक्क्यांनी वाढ झाली आहे, तर मृत्यू आणि जखमींच्या संख्येत 15 टक्क्यांनी वाढ झाली आहे. राज्यात 2020 मध्ये 24,971 अपघात, 11,569 मृत्यू आणि 19,914 जखमींची नोंद आहे.